हापूसच्या कोकणात पिकतात स्ट्रॉबेरी, कलिंगडासोबत केळी, कृषी क्षेत्रात आर्थिक क्रांती
By संदीप आडनाईक | Published: March 3, 2023 05:19 PM2023-03-03T17:19:11+5:302023-03-03T17:19:39+5:30
कोकणातील कलिंगड आणि स्ट्राॅबेरीचा स्वादही हापूसप्रमाणेच न्यारा
संदीप आडनाईक
कणकवली : कोकणातील तरुण कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने कोकणाची अर्थव्यवस्थाच बदलण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईत चाकरमानी म्हणून काम करण्यातील आर्थिक तोटा पाहून गावी येऊन आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा फायद्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
कोकणातील कातळावर मातीचा भराव करून भात, नाचणीसारख्या खरीप पिकातून थोडेफार उत्पन्न मिळवत रब्बी हंगामात कलिंगड, केळी, काकडी, मिरची, भोपळा अशी पिके घेऊन पाच लाखांहून अधिक रुपयांचे उत्पन्न मिळविल्याने बेकार तरुणांना आर्थिक क्रांतीचा हा नवा मार्ग दाखवून दिला आहे. कोकणातील कलिंगड आणि स्ट्राॅबेरीचा स्वादही हापूसप्रमाणेच न्यारा असल्याने पर्यटकांकडून त्याला मागणी आहे.
तीन महिन्यांत येणारे हे पीक सिंधुदुर्गातील आंबोली आणि सावंतवाडी तालुक्यातील घारपी गावच्या शेतकऱ्यांनी घेतले आहे. घारपी गावात केरळच्या जोश कर्णाई, तर दापोलीजवळील नीलेश तांबे तसेच जैन आडनावाच्या तरुणांनी सुधारित बियाण्यांचा वापर करून मोठ्या कष्टाने कोकणात हा प्रयोग राबवला. आंबोलीतील शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीचे तीन महिन्यात २५ हजारांचे उत्पन्न घेतले.
दापोलीच्या शेतकऱ्याने सेंद्रिय कलिंगड आणि स्ट्रॉबेरीतून ३ लाख रुपयांचा नफा मिळवला. सावंतवाडीतील जोश कर्णाई अर्धा एकर जागेवर गेली तीन वर्षे स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेत आहेत. दिवसाआड त्यांना २५ किलोंचे उत्पन्न मिळाले.
वडिलोपार्जित जमिनीत शेती करण्याचा धाडसी निर्णय घेत शेतीही फायदेशीर ठरू शकते, याचा वस्तुपाठ कोकणातील तरुणांनी घालून दिला आहे. या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून सेंद्रीिय खत, बियाणे, मल्चिंग पेपर, शेती अवजारे सबसिडीच्या माध्यमातून उपलब्ध झाली असून जिल्हा बँकेकडूनही आर्थिक सहकार्य लाभत आहे.
- घारपी गावात केरळच्या जोश कर्णाई यांचा स्ट्राॉबेरीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
- दापोलीजवळील नीलेश तांबे तसेच जैन या तरुणांनी सुधारित तंत्रज्ञान वापरले.
- कोकणातील स्ट्रॉबेरीचा स्वादही हापूसप्रमाणेच आहे.
हापूसप्रमाणेच कोकणच्या लाल मातीतील स्ट्रॉबेरीचे फळही अतिशय चांगले, रसाळ, गोड आणि गडद रंगाचे आहे. शिवाय टिकून राहण्याची क्षमता अधिक असल्याने लवकर खराब होत नाही, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा कोकणातील स्ट्रॉबेरीचा स्वादही हापूसप्रमाणेच न्याराच आहे. या स्ट्रॉबेरीला बाजारपेठेसह गोवा राज्यातही मोठी मागणी आहे. - डॉ. यू. एस. कदम, माजी विभागप्रमुख, कृषी आणि ठिबक अभियांत्रिकी विभाग, दापोली कृषी विद्यापीठ.