नाथ पै यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारणार : उदय सामंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 12:26 PM2021-01-30T12:26:17+5:302021-01-30T12:28:53+5:30
वेंगुर्ला तालुक्यात बॅ. नाथ पै यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्या ठिकाणी त्यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ल्यात दिली.
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यात बॅ. नाथ पै यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्या ठिकाणी त्यांच्या नावाने सांस्कृतिक केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात येतील, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ल्यात दिली.
राजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय माजी खासदार, संसदपटू बॅ. नाथ पै यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित बॅ. नाथ पै या पुस्तकाचे प्रकाशन बॅ. नाथ पै यांचे शालेय शिक्षण झालेल्या वेंगुर्ला शाळा नं. १ येथे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी पुस्तकाच्या लेखिका व नाथ पै यांची नात अदिती पै, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, रुची राऊत, नाथ पै शिक्षण संस्था कुडाळचे चेअरमन उमेश गाळवणकर, बॅ. नाथ पै यांचे सहकारी बाबुकाका अवसरे, बॅ. नाथ पै यांचे चिरंजीव शैलेंद्र पै, साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर, ॲड. देवदत्त परुळेकर आदी उपस्थित होते.
आपल्या आजी-आजोबा, आत्या यांच्याकडून वेंगुर्ल्यातील नाथ पै यांच्या आठवणींच्या गोष्टी ऐकायला मिळत असत. त्यामुळे त्यांच्याबद्दलची उत्सुकता वाढली आणि हे पुस्तक लिहिण्यात आले. या पुस्तकात लिखाण हे पुष्पसेन सावंत, आना महाले, बाबुकाका अवसरे यांच्याकडून माहिती घेऊन केले असल्याचे अदिती पै यांनी सांगितले. सूत्रसंचालन सचिन वालावलकर यांनी केले तर आभार ॲड. देवदत्त परुळेकर यांनी मानले.
स्मारकासाठी देणगी देणार
नाथ पै यांनी संसदीय लोकशाहीला फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी आम्ही स्पर्धा करू शकत नाही. कोकण रेल्वेच्या निर्धाराला गती देण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे नाव चिपी विमानतळाला देण्यासाठी आम्ही आग्रही राहू, असे प्रतिपादन खासदार राऊत यांनी केले. तर आमदार केसरकर म्हणाले, सीमा प्रश्नावर भाषण करीत असतानाच त्यांचे निधन झाले. नाथ पै यांच्या ५० व्या स्मृतिदिन वर्षात सीमा प्रश्न सुटल्यास तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. वेंगुर्ला केंद्रशाळा नं. १ मध्ये त्यांचे स्मारक होण्यासाठी १० लाखांची देणगी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.