करूळ, भुईबावडामध्ये पडझड सुरूच

By admin | Published: June 19, 2015 11:22 PM2015-06-19T23:22:46+5:302015-06-20T00:36:55+5:30

सिंधुदुर्गात संततधार : घाटातून एकेरी वाहतूक, जांभवडेत गोठा कोसळून वासराचा मृत्यू

Curl, Bhubabavada break down | करूळ, भुईबावडामध्ये पडझड सुरूच

करूळ, भुईबावडामध्ये पडझड सुरूच

Next

वैभववाडी : गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे करुळ आणि भुईबावडा घाटात दरडींची पडझड सुरुच आहे. त्यामुळे दुपारपर्यंत एकेरी वाहतूक सुरु होती. सार्वजनिक बांधकामने जेसीबीद्वारे दरडी हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. दरम्यान, जांभवडेत गोठा कोसळून वासराचा मृत्यू झाला तर ऐनारी फाट्यानजीक झाड पडल्याने खारेपाटण-गगनबावडा मार्ग काही तास पूर्णपणे बंद होता. तसेच भोम आणि भुईबावड्यात दोन घरांचे नुकसान झाले आहे.
गेल्या ४८ तासातील अतिवृष्टीमुळे दोन्ही घाटमार्गात दरडी कोसळण्याचे सत्र सुरुच आहे. परंतु या दरडी छोट्या स्वरूपाच्या असल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली नव्हती. भुईबावडा घाटात उशिरा चार ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे दुपारपर्यंत एकेरी वाहतूक सुरु होती. गगनबावड्यापासून सुमारे अडीच किलोमीटरवर कोसळलेल्या दरडीने निम्मा अधिक रस्ता व्यापला होता. तरीही एकेरी वाहतूक सुरु होती. घाटातील रस्त्यालगतची गटारे गाळाने भरल्याने पावसाचे संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहत आहे.
करुळ घाटातही चार ठिकाणी छोट्या दरडी कोसळल्या होत्या. सकाळी ९ वाजल्यापासून जेसीबीद्वारे करुळ घाटातील दरडी हटविण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली. वाहतुकीला अडथळा ठरणारे ढिगारे हटवून दुपारी १ नंतर भुईबावडा घाटातील दरडी हटविण्यास सुरुवात केली. त्यामुळे दुपारनंतर दोन्ही घाटातील वाहतूक सुरळीत झाली. सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता वनमोरे आणि सावंत दिवसभर घाटात हजर होते. घाटमार्गांच्या गटारातील गाळ काढण्याबरोबरच उर्वरित छोट्या दरडी हटविण्याचे काम शनिवारी सकाळी सुरु केले जाणार आहे.
इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाले
वेंगुर्लेत बुधवारी रात्री विजेचा अचानक दाब वाढल्याने राजू शिरोडकर, दिलीप राऊळ, मंदार कामत आदींसह नागरिकांचे टीव्ही, फॅन, फ्रीज, ट्युुब, बल्ब आदी इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाले.
शिवाजी चौकातील ट्रॉन्सफार्मरही जळाला. पावसासह घोंगावणाऱ्या वादळी वाऱ्याने वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले होते. तालुक्यात पावसाची संततधार उशिरापर्यंत सुरूच होती. (प्रतिनिधी)

जनशताब्दी रद्द, कोकण रेल्वे विस्कळीत
संततधार पावसाने मुंबईला झोडपून काढल्याने कोकण रेल्वेच्या गाड्यांवरही परिणाम झाला. १९ आणि २० जून रोजीची गोव्याच्या दिशेने जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर अनेक गाड्या उशिराने धावत होत्या. गोव्याच्या दिशेने जाणारी मांडवी एक्स्प्रेसही उशिराने धावत होती. दिवा पॅसेंजर दोन तास उशिराने धावत होती. मुंबईच्या दिशेने जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस शुक्रवारी दोन तास उशिराने धावत होती. मुंबई एक्स्प्रेस २ तास २५ मिनिटे उशिराने धावत होती. गोव्याकडे जाणारी मंगला एक्स्प्रेस पाच तास उशिराने धावत होती. एर्नाकुलम पुणे गाडी आणि कोकणकन्या अप एक्स्प्रेसही उशिराने धावत होत्या. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.


पावसाची दमदार सुरूवात
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून गेल्या २४ तासात सरासरी ६९.०८ मिलीमीटर तर आतापर्यंत एकूण सरासरी ४४२.३८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Curl, Bhubabavada break down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.