रिक्षाचालक मारहाण प्रकरणावर पडदा
By admin | Published: December 10, 2014 08:13 PM2014-12-10T20:13:09+5:302014-12-11T00:00:55+5:30
फोंडाघाटमधील प्रकरण : दोन्ही बाजूंनी परस्पर दिलगिरी व्यक्त
ओरोस : फोंडाघाट येथील रिक्षाचालक जयेश मोंडकर यांना सहायक मोटार वाहन निरीक्षकांकडून झालेल्या मारहाण प्रकरणावर दोन्ही बाजूंकडून परस्पर दिलगिरी व्यक्त करीत पडदा टाकण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सहायक मोटार वाहन निरीक्षक उदय पाटील यांनी आज, बुधवारी जिल्हा दौऱ्यावर असता फोंडाघाट येथे हरकुळ खुर्द येथील रिक्षाचालक जयेश मोंडकर यांना रिक्षाची कागदपत्रे नसल्याने ८ हजार रूपये दंडाचा मेमो दिला होता. मात्र त्यानंतर पाटील यांनी आपल्याला मारहाण केली, असे जयेश मोंडकर यांनी अन्य रिक्षाचालकांना सांगितले होते.
फोंडाघाट येथील रिक्षा चालक-मालक यांनी ओरोस येथे येऊन आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन छेडले होते. यावेळी उदय पाटील यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. मात्र, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर त्या दिवशी उपस्थित नसल्याने याप्रकरणी सोमवारी एकत्र बसून तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
दरम्यान, फोंडाघाट रिक्षा चालक-मालक ओरोस आरटीओ कार्यालयात दाखल झाले. किरण बीडकर यांच्या समक्ष झालेल्या चर्चेत सहायक मोटार वाहन निरीक्षक उदय पाटील यांनी आपली बाजू मांडली. त्यावेळी रिक्षाचालक जयेश मोंडकर यांच्याकडे रिक्षांचे कागदपत्र नव्हते. त्यानंतर त्यांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी जबरदस्तीने रिक्षा काढण्याचा प्रयत्न केला. तेथून जात असताना आपल्या रिक्षाचा धक्का लागला. तसेच एक चाकही पायावरून गेले. त्यावेळी पायाला दुखापत झाली. त्यामुळे पुढे जाऊन त्याला अडवले.
यावेळी मोंडकर यांनी पळण्याचा प्रयत्न केल्याने कदाचित अनावधानाने आपल्याकडून हात उगारला गेला, असे पाटील यांनी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. तर मोंडकर यांनीही आपल्याकडे कागदपत्र नव्हते, त्यामुळे आपल्याकडूनही चूक झाली, असे सांगितले. त्यामुळे आपापसातील दोन्ही बाजूच्या चौकशीत निष्पन्न झाल्यामुळे परस्परांनी दिलगिरी व्यक्त केली.
त्यानंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांच्यासमोर ही चर्चा केली गेली. यावेळी फोंडाघाट रिक्षाचालक, मालक व अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)