कातडी सोलून घेणारी....राबणारी ‘माय’

By admin | Published: January 3, 2016 09:41 PM2016-01-03T21:41:19+5:302016-01-04T00:55:42+5:30

कवितांनी भारावले वेंगुर्लेवासीय : बोधिकाव्य संमेलन उत्साहात; नवकवींचा उत्स्फूर्त सहभाग ठरला लक्ष्यवेधी

Cutting the skin ... | कातडी सोलून घेणारी....राबणारी ‘माय’

कातडी सोलून घेणारी....राबणारी ‘माय’

Next

सावळाराम भराडकर-- वेंगुर्ले  ..हे माय, पाठीचा कणा मोडेपर्यंत तू राबायचीस... सावकाराच्या शेतावर... सूर्य तापायचा तू जळायचीस... भुकेची आग आणि सूर्याची आग सारखीच वाढायची... तरीही तू इमानी... राबत रहायचीस... लव्याच्या काडीसारखी शेताच्या मेरेवर... आठ आणे मजुरीसाठी कातडी सोलून घ्यायचीस...
बोधिकाव्य संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी आ. सो. शेवरे यांनी सादर केलेली ही ‘माय’ कविता वेंगुर्लेतील संमेलनातील उपस्थितांना भावनाविवश करणारी ठरली. याशिवाय नवोदित कवींनी पुरोगामी, परिवर्तनवादी मांडलेल्या कविता कवी व्यवस्थेचे वर्तमानकालीन चित्र स्पष्ट करणाऱ्या होत्याच; पण त्याहीपेक्षा त्या साहित्य क्षेत्रात नवज्योत पेटविणाऱ्या नवकविताही ठरल्या. एकापेक्षा सरस सादर झालेल्या कवितांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
वेंगुर्ले साई मंगल कार्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विश्वरत्न सामाजिक संस्था आयोजित पहिले जिल्हास्तरीय बोधिकाव्य संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी आ. सो. शेवरे, कोमसापचे अध्यक्ष देवदत्त परुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी, समीक्षक सुनील कांबळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संमेलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी अनिल जाधव, कवी अरुण नाईक, विठ्ठल कदम, मधुकर मातोंडकर, विश्वरत्न संस्थेचे अध्यक्ष लाडू जाधव, आदी उपस्थित होते.
पुरोगामी परिवर्तनवादी कवितेचा जागर करण्यासाठी आणि भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत लोकशाही मूल्यांची निरंतनपणे जोपासना व्हावी व समाजासमाजातील सौदार्ह वाढून धार्मिक सहिष्णुतेचे संवेदनशीलतेचे वातावरण निर्माण व्हावे, वैज्ञानिक जाणीवेचा परिपोष होऊन जात, धर्म, पंथाच्या संकुचित चौकटी मोडून पाडाव्यात आणि परस्परांतील विश्वास व सामंजस्य वाढून निकोप समाजरचना घडावी, अशी सुसंवादी भूमिका घेऊनच या बोधिकाव्य संमेलनाची सुरुवात झाली.
सिद्धार्थ तांबे यांची भरकटलेल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांवरील कविता कवयित्री उषा जाधव यांनी सादर केली. अंधार वर्तुळातील वेदनापट या काव्यसंग्रहाचे नेरूर-कुडाळ येथील कवी अरुण नाईक यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी जीवनाचे विदारक चित्र आपल्या कवितेतून सादर केले. बाबासाहेबांनी जनतेला स्वाभिमानी बनविले, परंतु या चळवळीतील काही नेते, कार्यकर्ते मात्र विकले गेले आहेत. याचे शल्य देवगड-जामसंडेचे कवी मिलिंद जामसंडेकर यांनी व्यक्त करताना कविता सादर केली. बाबा, तू हवा होतास... बाबासाहेबांनंतर समाजात कोणी वाली उरला नाही... सत्तेच्या भागीदारीतील आपण प्रमुख आहोत... अशी दिवा स्वप्ने रंगवून, गप्पा मारून जिथे तिथे कविता सादर करणाऱ्या दलितांच्या स्वयंघोषित नेत्याचा मुखवटा ‘लय भारी’ या कवितेतून लाडू जाधव यांनी दाखवून उपस्थितांची वाहवा मिळविली.
आमचे गटतट अनेक असले तरी... बाबासाहेबांचे नाव घेऊन समाजात लढतो आम्ही... आमचे पत काही आहे हे पाहण्याअगोदरच... बहुजन समाजाचा नेता असण्याचा आव आणतो आम्ही भारी... सत्तेचा मुकुट आणि लाल दिव्याचा
गाजर... दिसल्याबरोबर करतो दुनियादारी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांचे वैचारिक मतभेद होते. परंतु, बाबासाहेबांनी कधी गांधींचा द्वेष केला नाही. आंबेडकरी कवी हे गांधींच्या विचारांचा प्रतिवाद करतात. परंतु, महात्मा गांधींच्या खुनाचे समर्थन करीत नाहीत. विचारवंतांवरील हल्ल्याचा आंबेडकरी कवी निषेध करतात. म्हणूनच कवी सुनील कांबळे हेतकर, मुंबई यांनी नथुरामाच्या मारेकऱ्यांचे मी काय करू या कवितेने उपस्थित जाणकार रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. कवी सुनील कांबळे कवितेने व्यक्त होताना हिंसाचारापासून मुक्त राहण्यासाठी बुद्धत्वाकडे जाण्याचा सल्ला कांबळेंनी सुचविला आहे. देशाची अखंडता, एकात्मता कायम टिकावी, अशी आशा व्यक्त करीत उपरोधिक शैलीत सादर केली.
मुंबईचे कवी संजय जाधव यांच्या कवितेनेही रसिकांची दाद मिळविली. संजय जाधव आज मी थोडासा भारतीय होणार आहे... या कवितेत व्यक्त होताना म्हणतात, क्षमा करा मित्रमैत्रिणीनो काय करू... माझ्या देशाचा पोतच वेगळा आहे... विविधता हाच त्याचा आत्मा आहे... असा अन्वयार्थ मांडला. हजारो वर्षांची गुलामगिरीची शृंखला बाबासाहेबांनी तोडली. माणसाला माणूस म्हणून जगावयास शिकवले. सामान्य माणसांना स्वातंत्र्य, समता बंधुता बहाल केली.
‘गाथाबोधी वृक्षाच्या पानांची’ या काव्यसंग्रहाची कवयित्री मनीषा जाधव यांनी बाबासाहेबांचे विचार व्यक्त करताना म्हणते, तू गुलामाला गुलामगिरीची करून दिलीस जाणीव... आणि आमूलाग्र बदल झाला... हाडामांसाच्या गोळ्यांनी... मुक्तीचा श्वास घेतला पहिल्यांदाच.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कांबळे यांनी, तर अनिल जाधव यांनी प्रास्ताविक केले. कर्पूरगौरव जाधव यांनी आभार मानले. (वार्ताहर)

कवयित्री जिद्दी जाधव यांनी अजूनही समाजातील जात नष्ट होत नसल्याची खंत आपल्या कवितेतून व्यक्त केली.
कवी अनिल जाधव यांनी संमेलनाध्यक्ष कवी आ. सो. शेवरे यांची मृत्यूपत्र कविता सादर केली. भगवान बुद्धांचा देश आपणच वाचवणार आहोत. याची जाणीव प्रसंवादचे संपादक अनिल जाधव यांनी आपल्या ‘दिशा’ या कवितेत करून दिली.
स्थानिक कवी राकेश वराडकर यांनी बाबासाहेबांचा रथ मागे खेचू नका, असे सांगत... ऐक सांगतो विचारधारा... गीत त्याला समजू नका... रथ समतेचा पुढेच जावो... मागे त्याला खेचू नका... असे आवाहन केले.

Web Title: Cutting the skin ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.