अरबी समुद्रात ‘बिपर जॉय’ चक्रीवादळाची निर्मिती, मच्छिमाऱ्यांनो समुद्रात जाणे टाळा; प्रशासनाच्या सूचना
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 7, 2023 05:39 PM2023-06-07T17:39:18+5:302023-06-07T17:49:38+5:30
वेंगुर्ला ते वास्को दरम्यान समुद्रात लाटा उसळणार
सिंधुदुर्ग : प्रादेशिक हवामान विभाग,मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्रात ‘बिपर जॉय’ नावाचे चक्रीवादळ तयार झालेले आहे. या वादळामुळे दि. ७ ते ९ जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये. तसेच जे मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किनारी परत यावे. या कालावधीत समुद्र किनारी वेगाने वारे वाहणार असल्याने नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्र किनारी (बिचेसवर) जाणे टाळावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
याकालावधीत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये . तसेच जे मच्छिमार मासेमारीसाठी समुद्रात गेलेले असतील त्यांनी किनारी परत यावे. समुद्र खवळलेला राहणार असल्याने या कालावधीत नागरिकांनी समुद्रात जावू नये. समुद्राच्या ठिकाणी सेल्फी काढू नये. कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष ०२३६२-२२८८४७ किंवा टोल फ्री १०७७ ला संपर्क करावा.
हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imdumbai.gov.in या संकेस्थळावरुन घ्यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सुत्राकडून घ्यावी, असे आवानही करण्यात आले आहे.
वेंगुर्ला ते वास्को दरम्यान समुद्रात लाटा उसळणार
जिल्ह्यात दि. ७ ते ८ जून रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असून दि. ९ व १० जून रोजी गडगडाट होऊन पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व ३० ते ४० प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच दि. ७ जून रोजी रात्री ११.३० पर्यंत वेंगुर्ला ते वास्को या समुद्र किनारी २.३ ते ३.२ मीटर च्या लाटा उसळणार आहेत अशी माहिती हैद्राबाद या संस्थेकडून प्रसारित करण्यात आलेली आहे.