Cyclone Nisarga : भुईबावडा परिसराला चक्रीवादळाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:08 PM2020-06-05T17:08:16+5:302020-06-05T17:08:39+5:30
वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा, तिरवडे तर्फ खारेपाटण आणि हेत या तीन गावात गुरुवारी पहाटेच्या सुमारास चक्रीवादळ झाले. या चक्रीवादळात तिरवडेतील २ तर भुईबावड्यातील एका घराचे नुकसान झाले आहे. तर हेत केंद्रशाळेच्या छपराचे नुकसान झाले आहे. वीजवाहिन्या तुटल्याने गावातील काही भागाचा वीजपुरवठा खंडित झाला असून काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वैभववाडी : तालुक्यातील भुईबावडा, तिरवडे तर्फ खारेपाटण आणि हेत या तीन गावात गुरुवारी पहाटेच्या सुमारास चक्रीवादळ झाले. या चक्रीवादळात तिरवडेतील २ तर भुईबावड्यातील एका घराचे नुकसान झाले आहे. तर हेत केंद्रशाळेच्या छपराचे नुकसान झाले आहे. वीजवाहिन्या तुटल्याने गावातील काही भागाचा वीजपुरवठा खंडित झाला असून काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
निसर्ग वादळाचा धोका बुधवारी टळल्यानंतर पाऊसही कमी झाला. त्यामुळे तितकेसे नुकसान झाले नाही. मात्र, गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भुईबावडा परिसराला चक्रीवादळाचा सौम्य तडाखा बसला.
भुईबावडा पहिलीवाडी येथील दीपक सीताराम पांचाळ यांच्या घराची कौले वादळात उडून गेली. तसेच सिमेंटचे पत्रेही फुटले आहेत. त्यामुळे साखरझोपेत असलेल्या पांचाळ कुटुंबाला धडकी भरली. सुदैवाने कोणालाही ईजा झाली नाही. मात्र, पांचाळ यांचे १३ हजार ६२५ रुपयांचे नुकसान झाले.
तिरवडे तर्फ खारेपटण येथील श्रीधर कलमष्टे यांच्या घराच्या छपराचे सर्व पत्रे वादळात उडून गेले. त्यामुळे कलमष्टे यांचे ३० हजार रुपयांचे तर रघुनाथ शंकर पवार यांच्या घराच्या छपराचे ३ हजार रुपये नुकसान झाले. या नुकसानीचा महसूल विभागाने पंचनामा केला आहे.
हेत केंद्रशाळेच्या छपराचे पत्रे उडाले
हेत केंद्रशाळेच्या छपराचे पत्रे आणि कौले फुटली आहेत. तर वीजवाहिन्या तुटल्याने गावातील काही भागाचा वीजपुरवठा दिवसभर खंडित झाला होता. चक्रीवादळामुळे हेत गावातील काजू बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, २४ तासांत तालुक्यात १०८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.