Cyclone Nisarga: वादळ नुकसानीचा तातडीने सर्व्हे करा, नारायण राणेंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 03:54 PM2020-06-06T15:54:59+5:302020-06-06T16:00:22+5:30
निसर्ग चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा तत्काळ सर्व्हे करण्यात यावा आणि कोरोना कालावधीत गांव पातळीवर काम करणाऱ्या सरपंचांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
सिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळामुळेसिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा तत्काळ सर्व्हे करण्यात यावा आणि कोरोना कालावधीत गांव पातळीवर काम करणाऱ्या सरपंचांना निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत १०५ रुग्ण आढळले आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे. मात्र जिल्ह्याची आरोग्ययंत्रणा कोरोनाबाधित रुग्णांवर योग्यरित्या उपचार करत नाही. रुग्णांचे हाल होत असल्याच्या तक्रारी त्यांचे नातेवाईक करत आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला शासनाने वाढीव निधी देणे आवश्यक होते, असे असतानाही हे सरकार जिल्ह्याला दिलेला निधी परत घेत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केला आहे.
जिल्ह्यात उद्भवलेले कोरोनाचे संकट, निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान आणि परत जात असलेला निधी या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे भेट घेत चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी आमदार नीतेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सावी लोके, माधुरी बांदेकर, शारदा कांबळे, प्रमोद जठार, अतुल काळसेकर आदी उपस्थित होते.
निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात नुकसान झाले आहे. त्याचा सर्व्हे त्वरित व्हावा, गाव पातळीवर कोरोना पार्श्वभूमीवर कार्यरत असलेल्या सरपंचांना निधी उपलब्ध करून देण्यात यावी अशी सूचना जिल्हाधिकाºयांना केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोरोनाग्रस्तांची काळजी घेण्याची शासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा शल्यचिकित्सकांवर कारवाई करावीच लागेल
जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाचा अहवाल प्रथम पॉझिटिव्ह येतो मग निगेटिव्ह येतो. रुग्णांची होत असलेली हेळसांड आदी बाबींचा आमदार नीतेश राणे यांनी पदार्फाश केला आहे. तसेच याला जबाबदार असणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. मात्र रुग्णांबाबत बेफिकीर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावीच लागेल . परंतु, कारवाई होत नसल्यास याबाबत आम्ही अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून कारवाई करण्यास भाग पाडू, असा इशाराही खासदार राणे यांनी दिला आहे.
१४ कोटींमध्ये जिल्ह्याचा विकास कसा होणार !
- सन २0१९-२0 ची चांदा ते बांदा योजना आणि २0२0-२१ च्या बजेट बाबत चर्चा केली असता चांदा ते बांदा योजनेचे तब्बल ९२ कोटी रुपये शासनाला परत केले आहेत.
- २0२0-२१ च्या १४४ कोटी बजेटमध्ये कपात करून केवळ ४४ कोटी निधी मंजूर केला आहे.
- केवळ १४ कोटी रुपये शासनाने जिल्ह्याला दिले आहेत अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र १४ कोटींमध्ये जिल्ह्याचा विकास कसा होणार असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.
आवश्यक साधनसामुग्रीची मागणी करणार
राणे म्हणाले की, जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्ह्यात आढळलेले सर्व रुग्ण हे मुंबईमधील आहेत. आरोग्य यंत्रणा रुग्णांवर उपचार करायला कमी पडत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यकत्या सुविधा दिल्या जात नाहीत. त्यांचे हाल होत असल्याच्या तक्रारी त्यांचे नातेवाईक करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच याकडे जिल्हाधिकाºयांचे लक्ष वेधण्यात आले. शासनाने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला आवश्यक ती साधन सामुग्री उपलब्ध करून द्यावी, यासाठी शासनाकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार राज्य चालविण्यास अपयशी
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. अशा कालावधीत जिल्ह्याला राज्य शासनाकडून वाढीव निधी देणे आवश्यक होते. मात्र तसे न करता राज्य सरकार जिल्ह्याला प्राप्त झालेला निधी परत मागे घेत आहे.
कमी निधीमध्ये विकास कसा होणार ? असे सांगत हे सरकार राज्य चालविण्यास अपयशी ठरले असल्याचा आरोप राणे यांनी केला.