ऑक्सिजनची गळती : जिल्हा रुग्णालयातील सिलिंडर पाईप लिकेज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 05:03 PM2021-02-10T17:03:17+5:302021-02-10T17:05:47+5:30
hospital Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालय येथील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या युनिटमधील एका सिलिंडरचा पाईप लिकेज झाल्याने ऑक्सिजनची गळती झाली. मात्र, या ऑक्सिजनचा दाब एवढा होता की स्फोटसदृश आवाज झाला. यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, आवाजाची तीव्रता जास्त असल्याने जिल्हा रुग्णालयातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालय येथील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या युनिटमधील एका सिलिंडरचा पाईप लिकेज झाल्याने ऑक्सिजनची गळती झाली. मात्र, या ऑक्सिजनचा दाब एवढा होता की स्फोटसदृश आवाज झाला. यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, आवाजाची तीव्रता जास्त असल्याने जिल्हा रुग्णालयातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय येथे कोरोना रुग्णांसाठी जिल्हा कोविड रुग्णालय निर्माण करण्यात आले आहे. या ठिकाणी उपचारासाठी ठेवण्यात आलेल्या रुग्णांना काही वेळा ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागतो. त्यामुळे याठिकाणी जिल्हा नियोजनमधून लाखो रुपयांचा निधी खर्च करून ऑक्सिजन प्लांट तयार करण्यात आला आहे. शिवाय या ऑक्सिजनचा रुग्णांना पुरवठा करण्यासाठी १० - १० ऑक्सिजन सिलिंडर असलेले दोन युनिट उभारण्यात आले आहेत.
या युनिटमधील एका सिलिंडरमध्ये मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास गळती लागली होती. मात्र, ही गळती सुरू झाल्यावर सिलिंडरमधून मोठ्या दाबाने ऑक्सिजन बाहेर पडू लागला. ऑक्सिजनच्या दाबाचा आवाज एवढा प्रचंड होता की जिल्हा रुग्णालयात जणू स्फोट झाल्याचे भासले. स्फोट सदृश आवाजाची तीव्रता एवढी होती की जिल्हा रुग्णालय परिसर दणाणून गेला.
अचानक स्फोट झाल्याने कर्मचारी आणि कोरोना वॉर्डात असलेले रुग्ण, आजूबाजूला असलेले करोना रुग्णांचे नातेवाईक यांची धावपळ उडाली. अचानक झालेल्या या स्फोटामुळे कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले. परंतु संबंधित ऑक्सिजन प्लांटच्या यंत्रणेने तातडीने येऊन पाहणी केली असता सिलिंडरवरील कॅप उडून हा स्फोट झाल्याचे स्पष्ट झाले. या स्फोटाचा आवाज मोठ्या प्रमाणात झाला असला तरी कोणतीही जीवितहानी किंवा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कर्मचाऱ्यांमध्ये व रुग्णांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण होते.
ऑक्सिजन प्लांटवर तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती करणार
ऑक्सिजन प्लांटवर जोडण्यात येणारे सिलिंडर योग्यरित्या बसविणे आवश्यक असते. त्यासाठी लागणारे तज्ज्ञ व्यक्ती लवकरच नियुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगत यावेळी रुग्णालयात ऑक्सिजन वर उपचार घेणाऱ्या ४ रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलविले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.