बैल गोठ्यात गेल्याच्या रागातून दाम्पत्यास मारहाण; नाधवडेतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:37 AM2019-04-22T10:37:39+5:302019-04-22T10:38:51+5:30
बैल गोठ्यात गेल्याच्या रागातून नाधवडे ब्राम्हणदेववाडी येथील मनोहर सोनू गवस (६०) आणि त्यांची पत्नी राजश्री गवस (५६) या दाम्पत्याला मुद्रस पिता-पुत्राने लाकडी दांडा व हाताने बेदम मारहाण केली. यामध्ये मनोहर गवस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
वैभववाडी : बैल गोठ्यात गेल्याच्या रागातून नाधवडे ब्राम्हणदेववाडी येथील मनोहर सोनू गवस (६०) आणि त्यांची पत्नी राजश्री गवस (५६) या दाम्पत्याला मुद्रस पिता-पुत्राने लाकडी दांडा व हाताने बेदम मारहाण केली. यामध्ये मनोहर गवस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान शेजारच्या महिलेने त्यांना सोडविल्यावर मुद्रस पितापुत्रांनी ह्यतुला बघून घेतोह्ण अशी धमकीही दिल्याची तक्रार मनोहर गवस यांनी दिली असून पोलिसांनी मुद्रस पिता-पुत्रांविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, ह्यनाधवडे ब्राम्हणदेववाडी येथील मनोहर गवस यांनी चरावयास सोडलेल्या तीन गुरांपैकी एक बैल रात्री उशिरापर्यंत घरी आला नव्हता. त्यामुळे ते बैल शोधण्यासाठी वाडीत निघाले होते. बैल शोधत ते महादेव भरडे यांच्या घराजवळ पोहोचले असता चंद्रकांत दत्ताराम मुद्रस आणि गुरुप्रसाद चंद्रकांत मुद्रस हे पिता-पुत्र तेथे गेले. त्यांनी तुझा बैल आमच्या गोठ्यात आला आहे. त्या बैलाने आमच्या गोठ्यातील जनावरांना मारले असते तर? असा प्रश्न उपस्थित करीत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी गवस यांनी शिव्या कशाला देता? अशी विचारणा करताच मुद्रस पितापुत्राने हातातील लाकडी दांडा आणि हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गवस यांनी आरडाओरडा केला. त्यांच्या आवाजाने पत्नी राजश्री गवस तेथे गेल्या. त्यांनाही मारहाण करून मुद्रस पितापुत्राने गटारात ढकलून दिले.
त्यानंतर शेजारील राजश्री भरडे यांनी मध्यस्थी करीत दोघांना बाजूला केले. त्यावेळी तुला बघून घेतो, अशी धमकी त्या दोघांनी दिली. या मारहाणीत गवस यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडण्यात आले.
गवस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी भारतीय मुद्रस पितापुत्रांविरूद्ध गुन्हा नोंदविला असून पोलीस नाईक बाबासाहेब चौगले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
गवस जखमी
बैल गोठ्यात गेल्याच्या रागातून नाधवडे येथील मारहाणीत गवस यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.