नंबरप्लेटवर दादा-मामा
By admin | Published: February 19, 2015 11:00 PM2015-02-19T23:00:52+5:302015-02-19T23:40:44+5:30
नियम धाब्यावर : विविधांगी प्लेटस्मुळे पोलीस हतबल
फुणगूस : वाहनांच्या नंबरप्लेटच्या जागी वेगवेगळी विशेषणे लावण्याच्या हव्यासापोटी पोलीस यंत्रणा हवालदिल झाली आहे. यानंतर अजून कोणत्या पद्धतीचा वापर केला जाणार व कितीजणांवर कारवाईचे हत्यार उपसावे लागणार, हा पोलिसांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे.वाहनांच्या नंबरप्लेट कशा असाव्यात, याबाबत परिवहन विभागाने नियमावली तयार केली असली तरी ती पाळली जात नसल्याचे पाहायला मिळते आहे. इंग्रजी क्रमांकांना मराठी अक्षरामध्ये स्वरुप देऊन अफलातून कल्पना लढवून नाना, बॉस, दादा, राज, बाबा अशी विशेषणे लावून आपल्याला गाडीची विशिष्ट ओळख करुन देण्याची सध्या चुरस लागली आहे.
संगणकीय युगात वाहनांचे नंबर प्लेट संगणकाच्या सहाय्याने बनवण्यात येऊ लागल्यापासून या नंबरप्लेट अधिकाधिक फॅन्सी कशा बनवता येतील, याकडे संबंधितांचे लक्ष आहे. त्यातूनच मग ७१७१ क्रमांक असेल तर मराठी शब्द नाना, ४१४१ हा क्रमांक असेल तर मराठी शब्द दादा, ८०५५ असेल तर इंग्रजी शब्द बॉस अशा अनेक रचना नंबरप्लेट निर्मात्यांनी आणि नंबर धारकांनीही बनवल्या असल्याचे दिसून येत आहे, तर एवढ्यावर न थांबता काही ठिकाणी नंबरप्लेटवरील आकड्यांची उंची आणि रुंदी कमी करुन त्या जागी आपल्या लाडक्या बाळाचा फोटो लावला जातो. आवडत्या नेत्याच्या किंवा पदाचा सिम्बॉलचा फोटो लावून आपण किती कट्टर आहोत हे दाखवण्याचा खटाटोप केलेला दिसून येत आहे.
वास्तविक आरटीओंनी बनवलेल्या नियमावलीत वाहनांच्या नंबर प्लेट कशा असाव्यात? त्याची लांबीŸरुंदी किती असावी? त्यावरील अक्षरे आणि आकड्यांची लांबीŸरुंदी किती असावी? अक्षरांचा रंग कोणता असावा, याविषयी मापदंड ठरवून दिलेले आहेत असे असूनसुद्धा रस्त्यावरुन अशा प्रकारच्या फॅन्सी नंबरप्लेटवाल्या गाड्या अद्याप धावतच आहेत. याकडे आरटीओ दुर्लक्ष का करतात, अशी विचारणा जनतेकडून केली जात आहे.
यापूर्वी शासनाने काढलेल्या फतव्यानुसार आपल्या गाडीवर आपल्या व्यवसायाशी संबंधित कोणतेही सूचक शब्द उदा. पोलीस, आश्मी, प्रेस वगैरे लिहू नयेत असा आदेश देण्यात आला होता. पण, तो आदेश धाब्यावर बसवले जात असून, अजूनही अनेक वाहनाच्या मागे पुढे सूचक शब्द लिहिलेले दिसून येतच असतात. आता प्रश्न आहे तो या बाबा, बॉस, दादा, नाना वर कारवाईचा बडगा केव्हा उगारणार. कारण अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई न झाल्यास जनतेचा नियमावलीवरचा विश्वास उडून जातो. त्यामुळे आरटीओ आणि पोलीस यंत्रणेने अशा प्रकारच्या नंबरप्लेटबाबत कडक धोरण अवलंबावे, अशी मागणी केली जात आहे. असे विशिष्ट क्रमांक विकत घेणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. याबाबत अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
वाहनांच्या नंबर प्लेट्स रंगीबेरंगी व विविध शैलीत करण्याच्या तयारीत वाहनचालक असतात. आदेश धाब्यावर बसवून व्यवहार केला जात असल्याबद्दल नाराजी आहे.