धरण दुरुस्तीबाबत अनास्थाच!

By admin | Published: February 9, 2015 01:18 AM2015-02-09T01:18:22+5:302015-02-09T01:22:06+5:30

रत्नागिरी नगरपालिका : फेबु्रवारीअखेर धरणातील पाणीसाठा संपणार

Damage to dam repair! | धरण दुरुस्तीबाबत अनास्थाच!

धरण दुरुस्तीबाबत अनास्थाच!

Next

प्रकाश वराडकर - रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणातील पाणीसाठा फेब्रुवारीअखेर पुरेल. त्यानंतर शीळ धरणातूनच शहराला लागणारे पाणी पूर्णत: घ्यावे लागणार आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासूनची ही स्थिती आहे. गाळाने भरलेल्या व खचलेल्या पानवल धरणाच्या दुरुस्तीचा दरवर्षी ठणाणा करणाऱ्या राजकीय पक्षांकडून नव्याने धरण उभारण्याबाबत कोणत्याही हालचाली नसल्याने नाजूक स्थितीत असलेले हे धरण केव्हा कोसळेल, याचा नेम नसल्याच्या प्रतिक्रीयाही व्यक्त होत आहेत.
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे पानवल हे धरण हातखंब्याजवळ असून ते सर्वाधिक जुने धरण आहे. या धरणावरून नैसर्गिक गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करून रत्नागिरीपर्यंत पाणी आणले जाते. त्यासाठी विजेचा वापर करावा लागत नाही. रत्नागिरीची लोकसंख्या सहा दशकांपूर्वी खूप कमी होती. तरीही त्यावेळच्या पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करीत पानवल येथे रत्नागिरी पालिकेसाठी जागा घेतली. तेथील नदीवर धरण बांधले गेले.
या धरणातून रत्नागिरी शहराला दररोज दीड ते दोन दशलक्ष लीटर्स पाणीपुरवठा केला जातो. सध्या या धरणातून पावणेदोन एमएलडी पाण्याचा पुरवठा शहराला केला जात आहे. मात्र, विजेचा लाखो रुपयांचा खर्च वाचविणाऱ्या या धरणाकडे गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी पालिकेत येणाऱ्या कोणत्याही कारभाऱ्यांकडून गंभीरपणे लक्ष दिले गेले नाही. सहा वर्षांपूर्वी या धरणातील गाळ उपसा करण्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. उपसा केलेला गाळ धरण पात्राच्या कडेलाच ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात पुन्हा तो गाळ धरणात गेला. त्यामुळे केलेला खर्च पाण्यात गेला.
धरणाची सध्याची स्थिती अत्यंत बिकट आहे. हे धरण पायथ्याला खचलेले असून, केव्हाही कोसळू शकते, अशी स्थिती आहे. वेळोवेळी दुरुस्ती न झाल्याने धरणाची स्थिती अधिकच नाजूक बनली आहे. हे धरण दुरुस्त केल्यास शहराला मोठ्या प्रमाणात पाणी मिळेल व लाखो रुपयांचे वीजबिलही वाचेल. परंतु या धरणाकडे दुर्लक्ष करीत शीळ धरणातील पाणी खेचण्याकडेच पालिकेतील कारभाऱ्यांचा अधिक कल असतो.
शीळच्या पाण्यासाठी दर महिन्याला २० लाखांपर्यंत वीजबिल मोजावे लागते. हे वीजबिल कमी करायचे असेल, तर पानवल धरण नव्याने उभारण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.

Web Title: Damage to dam repair!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.