हत्तींकडून नुकसानी सुरुच
By admin | Published: December 14, 2014 09:32 PM2014-12-14T21:32:27+5:302014-12-14T23:51:54+5:30
माणगाववासीयांमध्ये दहशत : एका रात्रीत ५१ माड जमीनदोस्त
विजय पालकर -माणगाव --कुडाळ तालुक्यातील हत्तींनी पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील नानेली येथे गेले दहा दिवसात लाखो रुपयांचे नुकसान या हत्तींनी केले आहे. हत्तींच्या हल्ल्यात आतापर्यंत २00६ पासून कुडाळातील पाच व्यक्तिंचा मृत्यू झाला असून आठ जणांना गंभीर केले आहे. माणगाव पंचक्रोशीतील सुरु असलेल्या त्रासाला नागरिक पुरते कंटाळले आहेत. मात्र, प्रशासनस्तरावरुन, लोकप्रतिनिधी तसेच वनविभागाकडून हे रोजचेच झाल्याच्या आविर्भावात दुर्लक्ष केले जात आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून हत्तींना प्रशिक्षित करण्याच्या मोहिमेकडे लक्ष पुरवले जातानाच हत्तींपासून ग्रामस्थांचे रक्षण करण्याच्या भूमिकेकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. शनिवारी रात्री माणगावात पुन्हा एकदा हत्तींनी सुमारे ५१ माड जमिनदोस्त करत शेतकऱ्यांना धक्काच दिलेला आहे. त्यामुळे नुकसानीबरोबराच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकला आहे. यासाठी वनविभागाने नागरिकांच्या सुरक्षेलाही प्राधान्य देणे आवश्यक असून यादृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
कुडाळ तालुक्यातील नानेली परिसरात डिसेंबरच्या पहिल्या दिवसापासून तीन हत्तींच्या कळपाकडून नुकसानी करण्याचे सत्र सुरु झाले आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. नानेली गणेश मंदिराजवळील जंगलात या हत्तींचे वास्तव्य असून हे हत्ती सायंकाळी वस्तीत येऊन भाताची उडवी, माड बागायतींचे नुकसान करत आहेत. त्यामुळे हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीचा आकडाही वाढत चाललेला आहे. तर नानेलीवासीय हत्तीकडून होणाऱ्या नुकसानीला पाहत राहण्याशिवाय काहीही करु शकत नसल्याने भीतीच्या छायेत दिवस घालवत आहेत.
नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची
गेले काही दिवस माणगाव पंचक्रोशी तीन हत्तींच्या कळपाने पुरती हलवून सोडलेली आहे. वेताळबांबर्डे येथील नुकसानसत्रानंतर ग्रामस्थांनी रास्तारोकोही केला होता. मात्र, नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस काहीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यानंतर हत्ती नानेली परिसरात आणि तेथून पुन्हा माणगावात दाखल झाले आहेत. हत्तींची नुकसानीही हत्तींप्रमाणेच अवाढव्य झालेली असल्यानेच शेतकऱ्यांच्या भावनांचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो. हत्तींचा वस्तीतील वावर हा नागरिकांसाठी धोक्याचीच घंटा असून वनविभागाने नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे अन्यथा आणखी एखादा बळी गेल्यास प्रकरण हाताबाहेर जाण्याचीही शक्यता आहे.
हत्तींनी केलेली नुकसानी
४ डिसेंबर : घावनळे परिसरातील हत्तींनी नानेली शेळकुंडवाडी येथील दशरथ सावंत यांच्या शेतमांगराकडे जात दरवाजा तोडून भात व नाचणीच्या उडव्यांची व पोत्यांची नुकसानी केली. भाताची उडवी मांगरातून बाहेर काढत पायाखाली तुडवून टाकली. घावनळे परिसरात दोन हत्तीनी गुरुवारी रात्री दोन वाजेपर्यंत दिलीपसिंग भोसले यांचे पाच माड, सुरेश शिवडावकर यांचे पाच माड, शंकर शिवडावकर यांचे तीन माड उन्मळून टाकले. हत्तींनी नार्वेकरवाडी येथील भगवान नार्वेकर यांच्या भाताच्या उडवीचे, बाळा गंगाराम धुरी यांचे दोन माड, सुरेश गंगाराम धुरी यांचे तीन माड मोडून जमिनदोस्त केले.
७ डिसेंबर : रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास नानेली येथील शीतल नार्वेकर यांच्या खळ्यातील उडवी उद्ध्वस्त करून घराच्या सभोवतालचे माडही उद्ध्वस्त केले. तसेच नागेश नार्वेकर यांच्याही बागेतील माडांची नुकसानी करत राजाराम मंगेश नार्वेकर यांच्या भाताच्या उडव्यांचा समाचार घेतला. काळोख पडल्यावर हत्तींनी भरवस्तीत घुसून माड बायायतींची नुकसानी केली आहे. त्यामुळे नार्वेकरवाडीतील रहिवाशी भीतीग्रस्त आहेत. त्यानंतरही हत्ती नार्वेकरवाडीच्या परिसरातच धुडगूस घालत होते.
९ डिसेंबर : नानेली नार्वेकरवाडीतील गोविंद नारायण नार्वेकर यांच्या बागायतीमध्ये शिरुन माड व केळीच्या झाडांची नासधूस केली.
१0 डिसेंबर : नानेली येथील प्रमोद धुरी यांच्या शेतमांगरातील भाताच्या वासाने दरवाजा तोडून आत घुसून भातावर ताव मारला.
११ डिसेंबर : नानेली येथील वाचनालयाचा दरवाजा हत्तींनी तोडून टाकला. वाचनालयाच्या बाजूच्या खोलीतील भात हत्तींनी फस्त केले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली होती.
१२ डिसेंबर : माणगाव गंगोत्री परिसरातील शेतकऱ्यांचे सुमारे ५१ माड या हत्तींनी जमिनदोस्त केले आहेत. आनंद सगुण बांदेकर यांच्या घरातील दोन भाताची उडवी दरवाजा फोडून आत घुसून फस्त केल्या आहे. तर त्यांच्या कुंपणातील तेरा माड, वीस केळ्यांची झाडेही पाडली आहेत. मधुसुदन तेली यांचे सात माड, मोहन तेली यांचे चार माड, विष्णू तेली यांचे नऊ माड व पंचवीस केळीची झाडे, सुभाष तेली यांचे आठ माड, अशोक तेली यांचे दोन माड, मोहन तेली यांचे तीन माड तर बाबी तेली यांचे दोन असे तब्बल ५१ माड एका रात्रीत पाडत शेतकऱ्यांना मोठा धक्का दिलेला आहे. शनिवारी एका रात्रीत हत्तींकडून करण्यात आलेले नुकसान पाहून नानेली ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. हत्ती हटाव मोहीम लवकर राबवून या त्रासातून मुक्ती देण्याची मागणी नानेलीवासीयांनी केली आहे. तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही या भागात गस्त देण्याची मागणी केली आहे.
मोहिमेसाठी निलगिरी
झाडांचा शोध
माणगाव पंचक्रोशीत वावरणाऱ्या हत्तींना प्रशिक्षित करण्यासाठी वनविभाग मोहीम राबवित आहे. मात्र, हत्तींना प्रशिक्षण देण्यासाठी तयार कराव्या लागणाऱ्या क्रॉलसाठी २५ फूट उंच निलगिरीच्या सरळ झाडांची आवश्यकता आहे. मात्र, क्रॉलसाठी निलगिरीची झाडे शोधण्याचे काम सध्या सुरु असल्याने हत्तींना बंदीस्त करण्याची योजना बारगळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.