मालवण बंदर जेटी 'समुद्रात' दामोदर तोडणकर यांचे प्रशासनाविरोधात 'उपोषण'

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: November 7, 2023 06:38 PM2023-11-07T18:38:47+5:302023-11-07T18:39:16+5:30

लेखी स्वरूपात आश्वासन मिळेपर्यंत सुरूच

Damodar Todankar hunger strike against the administration at the Malvan port jetty sea | मालवण बंदर जेटी 'समुद्रात' दामोदर तोडणकर यांचे प्रशासनाविरोधात 'उपोषण'

मालवण बंदर जेटी 'समुद्रात' दामोदर तोडणकर यांचे प्रशासनाविरोधात 'उपोषण'

मालवण (सिंधुदुर्ग) : मालवण बंदर जेटी येथील पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी महसूल व बंदर विभाग प्रशासन विरोधात आक्रमक होत मालवण बंदर जेटीसमोरील समुद्रात मंगळवारी उपोषण छेडले आहे. समुद्रातील पाण्यात त्यांचे हे उपोषण सुरू आहे.

दरम्यान महसूल, बंदर व पोलिस प्रशासन यांनी होडीने समुद्रात जात दामोदर तोडणकर यांना उपोषण सोडण्यात यावे, असे सांगितले. मात्र, आपल्याला लेखी स्वरूपात ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे दामोदर तोडणकर म्हणाले.

आम्ही राहत असलेली बांधकाम शेड जमीनदोस्त करताना मालवण किनारपट्टीवरील अन्य ६७ बांधकामधारकांची यादी समोर आली होती. त्यांनाही अनधिकृत व अतिक्रमण बांधकाम तोडण्याबाबत ७ दिवस मुदतीच्या नोटिसा बंदर विभाग प्रशासनाने बजावल्या होत्या. नोटीस कालावधी संपला. त्यानुसार बांधकामांना तोडण्याबाबत बंदर विभाग अथवा प्रशासन यंत्रणा यांनी माझे बांधकाम जे न्यायालयीन लढाई स्वरूपातील होते ते जसे तोडले, त्याच धर्तीवर तत्काळ धडक कारवाई इतर बांधकामांबाबत करणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे मालवण बंदर जेटीसमोरील समुद्रात बेमुदत उपोषण करीत असल्याचे तोडणकर यांनी स्पष्ट केले.

कुटुंबासमवेत आत्मदहन करणार

आंदोलनाची पुढील दिशा ही मालवण बंदर विभाग अथवा मालवण तहसीलदार कार्यालयासमोर कुटुंबासमवेत आत्मदहन अशी असणार आहे. याना प्रशासनच जबाबदार असेल, असे दामोदर तोडणकर यांनी प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सोबत न्यायालयीन स्तरावर आपला लढा सुरू असल्याचे दामोदर तोडणकर यांनी सांगितले.

Web Title: Damodar Todankar hunger strike against the administration at the Malvan port jetty sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.