नडगिवे घाटात दरडींचा धोका कायम, खारेपाटणमध्ये संततधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 03:35 PM2020-06-13T15:35:52+5:302020-06-13T15:37:34+5:30
कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे महामार्गावरील नडगिवे घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळायला सुरुवात झाली आहे.
खारेपाटण : कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खारेपाटण परिसराला चांगलेच झोडपून काढले. काही ठिकाणी दरडी कोसळल्याने नुकसान झाले आहे. विशेष करून मुंबई-गोवा महामार्गाला याचा जास्त फटका बसला आहे.
महामार्गावरील नडगिवे घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळायला सुरुवात झाली आहे. दिवसभर महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने जेसीबी मशीनच्या सहाय्याने महामार्गावर कोसळलेली दरडीची माती, दगड हटविण्याचे काम जोरदार सुरू होते. तर महामार्गावर पाण्याचे पाट वाहताना दिसत होते.
खारेपाटण पंचशीलनगर येथील संतोष पाटणकर यांच्या घरच्या मागील बाजूला दरड कोसळली असून याला लागून असलेली संरक्षक भिंत तुटून चिरे माती सर्वत्र पसरली आहे. या दरडीमुळे पाटणकर यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे. तर त्यांच्या शेजारी घर असलेले संतोष तुरळकर यांची संरक्षक भिंत तुटून दरड कोसळल्यामुळे त्यांच्या देखील शौचालयाच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे.
सदरची घटना समजताच खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत व खारेपाटण तलाठी रमाकांत डगरे यांनी घटनास्थळी भेट देऊन कोसळलेल्या दरडीची पाहणी केली. खारेपाटण बॉक्सवेल समोरील विजय पराडकर यांच्या घरासमोरील दरड कोसळल्याने त्यांच्या घरासह सर्वच पराडकर बंधूंच्या घरांना धोका निर्माण झाला आहे.
खारेपाटण वरचे बसस्थानक येथील मुख्य मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेला रस्ता काही प्रमाणात खचला असून यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. मुळात इथे टाकण्यात आलेला मातीचा भराव योग्य पद्धतीने भरला गेला नसल्यामुळे तसेच जमिनीपासून या भरावाची मोठी उंची ठेवण्यात आली आहे. तसेच या रस्त्याला बांधण्यात आलेली संरक्षक भिंत अशी रस्ता खचण्याची अनेक कारणे असू शकतात. महामार्ग प्राधिकरणाकडून याची पुन्हा तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
कार्यालयात पाणी
खारेपाटण येथील मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याला गटार नसल्याने पडलेल्या मुसळधार पावसाने पाणी चक्क खारेपाटण येथील महामार्गाला लागून असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारात गेले. तर यालाच लागून असलेल्या महामार्गावरील प्रभाकर पोमेडकर यांच्या मोबाइलच्या दुकानासह अन्य दुकानदारांच्या देखील दुकान गाळ्यात या पावसाचे पाणी गेल्याने त्यांचे नुकसान झाले आहे.