धोकादायक वीज खांब बदलणार, वीज वितरण कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 03:04 PM2020-06-12T15:04:00+5:302020-06-12T15:06:14+5:30

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक झालेले तब्बल १९ वीज खांब बदलण्यात येणार असून त्यातील अती धोकादायक ठरणारे ९ वीज खांब तातडीने दोन दिवसांत बदलण्यात येणार आहेत. तसेच शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी तत्काळ आवश्यक ती उपाययोजना राबवा, अशी सूचना आपण वीज वितरण अधिकाऱ्यांना केल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Dangerous power poles to be replaced, | धोकादायक वीज खांब बदलणार, वीज वितरण कामांचा आढावा

सावंतवाडी येथे नगराध्यक्ष संजू परब व विद्युत अधिकारी यांच्यात बैठक पार पडली. यावेळी विविध उपाययोजना राबविण्यासंदर्भात चर्चा झाली.

googlenewsNext
ठळक मुद्देधोकादायक वीज खांब बदलणार, वीज वितरण कामांचा आढावादेवगड तालुक्यातील वीज खांब जीर्णावस्थेत

सावंतवाडी : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील धोकादायक झालेले तब्बल १९ वीज खांब बदलण्यात येणार असून त्यातील अती धोकादायक ठरणारे ९ वीज खांब तातडीने दोन दिवसांत बदलण्यात येणार आहेत. तसेच शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी तत्काळ आवश्यक ती उपाययोजना राबवा, अशी सूचना आपण वीज वितरण अधिकाऱ्यांना केल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वीज वितरणच्या कामांची आढावा बैठक नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या सभागृहात पार पडली. यावेळी वीज वितरणचे सहाय्यक उपअभियंता अनिल यादव यांना शहरातील विविध कामांसंदर्भात सूचना उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक अनारोजीन लोबो, राजू बेग, परिमल नाईक, मनोज नाईक, उदय नाईक, सुधीर आडिवरडेकर यांनी केली.

यावेळी शहरातील विविध भागांमध्ये जीर्ण झालेले विद्युत खांब बदलण्याबाबत सूचना करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने एकोणीस वीज खांब बदलण्याची मागणी करण्यात आली. त्यापैकी अति जीर्ण व धोकादायक असलेले नऊ खांब येत्या दोन दिवसांमध्ये बदलण्यात येतील, असे आश्वासन सहाय्यक उपअभियंता अनिल यादव यांनी दिले. तसेच विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी विद्युतभारित तारांवर आलेली झाडी तोडण्याची सूचना करण्यात आली.

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात २० कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. जून-जुलैमध्ये प्रादुर्भाव अधिक होण्याची शक्यता असल्यामुळे अधिक आवश्यकता भासल्यास हेल्थ पार्कमध्येही तातडीने २५ रुग्णांची व्यवस्था करण्यात येईल, असे ते म्हणाले.

सावंतवाडीत कोरोनाबाधितांसाठी व्यवस्था

कारिवडे येथे काही दिवसांपूर्वी आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, त्यावेळी उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या उपचारासाठी योग्य व्यवस्था नसल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात आता २० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार होतील अशी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहितीही नगराध्यक्ष परब यांनी यावेळी दिली.

देवगड तालुक्यातील वीज खांब जीर्णावस्थेत

देवगड : देवगड तालुक्यामध्ये अनेक विद्युत खांब व विद्युततारा जीर्ण झाल्या आहेत. पावसापूर्वी घ्यावयाची काळजी व दुरूस्तीची कामे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न झाल्याने पावसामध्ये वीज वितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन तालुका काळोखात राहण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरवर्षी पाऊस सुरू होण्याअगोदर वीज वितरण कंपनीकडून जीर्ण झालेले खांब व विद्युततारा बदलण्याची कामे केली जातात. मात्र यावर्षी कोरोनाने थैमान घातल्याने ही कामे पूर्णत: बंद होती. आता पावसाळा सुरू झाल्याने पहिल्याच पावसात तालुक्यातील अनेक गावांमध्ये वीज खांब पडून व विद्युततारा तुटून वीजपुरवठा सुमारे १०-१० तास खंडित झाला होता.

तसेच वीज वितरण कंपनीची डागडुजी करणाऱ्या ठेकेदारांचे कामगार गोंदिया, चंद्रपूरला आपल्या गावी गेल्याने वीज खांब उभारण्यापासून ते विद्युतवाहिन्या जोडण्यापर्यंत सर्व कामे वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनाच करावी लागणार आहेत. मात्र, हे कर्मचारी अपुरे असल्याने पावसाळ्यामधील देवगड तालुक्यातील विजेचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

यापूर्वी वीज खांब पडल्यास व तारा तुटल्यास दुरुस्तीची कामे ठेकेदारांमार्फत केली जात होती. मात्र या ठेकेदारांचे मजूर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावाला गेल्यामुळे ते पुन्हा परत येण्याची शक्यता कमी आहे. सध्या देवगड तालुक्यातील वाडा, जामसंडे, तळेबाजार, इळये, मोंड, फणसगाव ही सबस्टेशन आहेत. या सबस्टेशनमधील निम्म्याहून अधिक वायरमन पदे रिक्त आहेत.

यामुळे वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील वीज वाहिन्यांची कामे करणारे ठेकेदार नियुक्त करून जिल्ह्यातील मजुरांना घेण्यात यावे. तरच पावसाळ्यातील पडझडीच्या काळातील विजेच्या कामांचा प्रश्न निकाली लागू शकतो. तसेच शासनानेही तत्काळ वीज वितरण कंपनीतील देवगड तालुक्यातील विशेषत: वायरमनपदाची रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Dangerous power poles to be replaced,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.