दापोली शहर ‘स्मार्ट सीटी’ बनवणार

By admin | Published: October 11, 2015 11:00 PM2015-10-11T23:00:28+5:302015-10-12T00:29:14+5:30

जावेद मणियार : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगरपंचायतीचा सन्मान

Dapoli will make the city 'smart whistle' | दापोली शहर ‘स्मार्ट सीटी’ बनवणार

दापोली शहर ‘स्मार्ट सीटी’ बनवणार

Next

दापोली : दापोलीला स्मार्ट सीटी बनवणार असून, त्या दृष्टीने दापोली नगरपंचायतीची वाटचाल सुरु आहे. येत्या ६ महिन्यातच दापोलीचे बदलते रूप आपल्याला दिसणार आहे, अशी ग्वाही दापोली नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष जावेद मणियार यांनी दिली. स्वच्छ दापोली शहर ठेवल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नगरपंचायतीला सन्मानीत करण्यात आले. मणियार म्हणाले की, हा सन्मान माझ्या सर्व दापोलीकर नागरिकांचा आणि माझे सहकारी नगरसेवक तसेच नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा आहे. या सन्मानामुळे आमची जबाबदारी वाढली असून, दापोलीला स्मार्ट सीटी बनवण्याचे स्वप्न आम्ही उराशी बाळगून आहोत. हे स्वप्न लवकरच आम्ही सत्यात उतरवू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे १० आसनांचे सुलभ शौचालय, स्नानगृह असा सुमारे ३५ लाखांचा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. मच्छीमार्केटचा खूप दिवस रखडलेला गुंता सोडवण्यात यश आले आहे. सुमारे ८० ते ९० कोळी महिलांना मासे विक्रीसाठी बसण्याची सुविधा असलेले, ५ टन माश्यांना पुरेल एवढी व्यवस्था असलेले ‘कोल्डस्टोरेज’ अशा सुविधा असलेल्या मासे व मटण मार्केटचे काम या महिन्यातच सुरू करण्यात येणार आहे.
दापोली ग्रामपंचायत कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी चार माळ्यांची इमारत बांधण्याच्या सुमारे १ कोटी २५ लाख रूपयांच्या कामाला अंतिम स्वरूप आले असून, काही दिवसातच या कामाला प्रारंभ केला जाणार आहे. चालू वर्षी पर्जन्यमान कमी असले तरीही पाण्याचा टँकर लागणार नाही असे नियोजन नगरपंचायतीने केले आहे. सुमारे ४० टक्के जोडण्यांवर पाणी मीटर लावण्यात आले आहेत. यामुळे प्रतिदिन दीड लाख लीटर पाणी शिल्लक रहात असून, पाण्याचा अपव्यय कमी झाला आहे. महाराष्ट्र भूजल निर्मल योजनेतून व दलितवस्ती सुधार योजनेतून दलितांना नळ जोडणी व शौचालयासाठी प्रती कुटुंबाला रुपये १२,०००चा निधी देण्याचे प्रस्तावित असून, त्या अनषंगाने पूर्तता करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छतेबाबत मनुष्यबळ कमी आहे तसेच गाड्यासुध्दा मर्यादित आहेत तरीही योग्य नियोजनामुळे कचरा रस्त्यात न टाकता तो जमा करून नेण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे मणियार यांनी सांगितले.
स्वच्छता अभियान अंतर्गत शहरातील शाळांमधून जनजागृती करून प्रत्येक घरात बचत गटांच्या माध्यमातून कचऱ्यांचे डबे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओला व सुका कचरा जमा करण्याचे प्रशिक्षण देऊन कचऱ्यापासून वीज निर्मिती करुन दिवे लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दापोली शहर लवकरच कात टाकणार असून, दापोलीचे नवीन बदललेले रूप आपल्याला पहायला मिळेल, असा विश्वास नगराध्यक्ष जावेद मणियार यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)

शासनाचा पुरस्कार हा नगरसेवक, कर्मचारी आणि नागरिकांचा : मणियार.
सन्मानामुळे जबाबदारी वाढली.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या ठिकाणी चार मजल्यांच्या नवीन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात.

Web Title: Dapoli will make the city 'smart whistle'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.