दापोलीत चौरंगी लढत रंगणार

By admin | Published: October 1, 2014 11:12 PM2014-10-01T23:12:27+5:302014-10-02T00:12:48+5:30

राष्ट्रवादीतील बंडखोर किशोर देसाई यांची मते ठरवणार विजयी उमेदवार

Dapoli will play four quadrangular matches | दापोलीत चौरंगी लढत रंगणार

दापोलीत चौरंगी लढत रंगणार

Next

शिवाजी गोरे - दापोली विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, खरी लढत शिवसेनेचे विद्यमान आमदार सूर्यकांत दळवी विरुद्ध राष्ट्रवादीचे उमेदवार संजय कदम यांच्यात होणार आहे. तरीही भाजपाचे केदार साठे, काँग्रेसचे सुजित झिमण, कुणबी समाजाचे अपक्ष उमेदवार शशिकांत धाडवे, मनसेचे वैभव खेडेकर, राष्ट्रवादीचे बंडखोर किशोर देसाई यांच्यामुळे निवडणुकीला चांगली रंगत चढली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा या चार मुख्य पक्षात चौरंगी लढत होणार आहे. राष्ट्रवादीच्या बंडखोर अपक्ष उमेदवारांची मते विजयी उमेदवारासाठी निर्णायक ठरणार आहेत.
दापोली विधानसभा मतदारसंघ दापोली, खेड, मंडणगड या तीन तालुक्यांचा मिळून बनलेला आहे. या मतदार संघाला २००९च्या पुनर्रचनेत खेड तालुक्याचा काही भाग जोडला गेल्याने दापोली विधानसभा मतदार संघात चुरस वाढली. या मतदार संघात दापोली तालुक्यातील १७८ गावे, मंडणगडची ९०, तर खेडची ७० गावे जोडली गेल्याने या मतदार संघाचा भौगोलिक आकार बदलला. या मतदार संघात गेली २५ वर्षे शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे. शिवसेनेचे आमदार सूर्यकांत दळवी यांना राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी जोरदार ठसन देत आमदार नसतानाही राज्यातील सत्तेच्या जोरावर विकासकामे करुन दाखविली. सूर्यकांत दळवी आमदार असताना जेवढा निधी आणू शकले नाहीत, त्याहीपेक्षा अधिक निधी तीनही तालुक्यात आणला. त्यामुळे काँग्रेस आघाडीचे भावी उमेदवार म्हणून संजय कदम यांचेच नाव सातत्याने पुढे आणले जाऊ लागले. राष्ट्रवादीने या मतदार संघाची मागणीही रेटवून धरली. असे असतानाच काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी तुटली. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून संजय कदम यांचे नाव पुढे आले. परंतु राष्ट्रवादीचे तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले किशोर देसाई यांनी बंड केल्याने अप्रत्यक्षपणे शिवसेनेचा फायदा होईल. तरीही गेल्या निवडणुकीत आमदार दळवी यांना ४८ हजारांचे मताधिक्य होते. यावेळी शिवसेनेबरोबर भाजपा नाही. कुणबी समाजाने स्वतंत्र अपक्ष उमेदवार शशिकांत धाडवे उभा केल्याने शिवसेनेबरोबर असलेला ४० टक्के समाज शिवसेनेबरोबर नाही. त्यामुळे यावेळी शिवसेनेला ही निवडणूक जिंकणे सोपे नाही. संजय कदम यांना किशोर देसार्इंच्या बंडखोरीचा कितपत तोटा होतो, यावर शिवसेनेचा पेपर सोपा होण्यास मदत होणार आहे.
काँग्रेस - राष्ट्रवादी, अपक्ष किशोर देसाई यांच्यात मतांचे विभाजन झाल्यास शिवसेनेला फायदा होईल, असे वाटत असले तरीही कुणबी समाजाचे शशिकांत धाडवे, मनसेचे वैभव खेडेकर, भाजपाचे केदार साठे यांचा शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता असून, खरी लढत शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे बंडखोर किशोर देसाई यांनी आपला अर्ज मागे न घेतल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. १० वर्षांपूर्वी शिवसेनेतून बाहेर पडून अपक्ष म्हणून २० हजार मते घेऊन देसार्इंनी आपले अस्तित्व दाखवले होते. परंतु यावेळचा त्यांचा मतदारसंघावरचा दबदबा कायम आहे की नाही, हे येत्या निवडणुकीवरुन कळेल. आता निवडणुकीच्या रिंगणात १० उमेदवार आहेत आणि त्यांचे भवितव्य १९लाच समजेल.

दापोली
एकूण मतदार २,६३,८८१

नाव पक्ष
सूर्यकांत दळवीशिवसेना
केदार साठे भाजप
शशिकांत धाडवेस्वाभिमान ब. संघ
आदम चौगुलेबहुजन मु. मोर्चा
वैभव खेडेकरमनसे
संजय कदम राष्ट्रवादी
अ‍ॅड. सुजित झिमणकाँग्रेस
किशोर देसाईअपक्ष
दयानंद कांबळेबसपा
प्रदीप गंगावणेअपक्ष

Web Title: Dapoli will play four quadrangular matches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.