दसऱ्यालाच ‘हापूस’ बाजारात दाखल
By admin | Published: October 26, 2015 11:42 PM2015-10-26T23:42:16+5:302015-10-27T00:10:45+5:30
उदय नरवणकर : ४०० पैकी केवळ एकाच झाडाला १०० आंबे
दापोली : फळांचा राजा हापूस आंब्याने यंदा आपल्या आगमनाचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. यंदा तो दिवाळीत नव्हे; तर चक्क दसऱ्याच्या दिवशी बाजारात दाखल झाला आहे. हर्णै येथील प्रगतशील आंबा बागायतदार उदय नरवणकर यांच्या आंब्याच्या झाडावर शंभरपेक्षा अधिक आंबे लगडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आपल्या परसदारातील आंब्याच्या झाडाने आगमनाचे सर्व विक्रम मोडीत काढल्याचा आनंद नरवणकर यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या वर्षीपासून पुढे जोपर्यंत नवरात्रोत्सवात आंबा बाजारात येत नाही तोपर्यंत हा विक्रम त्यांच्या नावावर अबाधित राहणार आहे. याबाबत बोलताना उदय नरवणकर म्हणाले की, याच वर्षी जून महिन्याच्या अखेरपर्यंत आपल्या बागेतील आंब्याच्या झाडावर आंबे होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात काही मिनिटांकरिताच एक वादळ आले. यात आपल्या घराच्या दारातील आंब्याच्या झाडाची फांदी तुटली. जुलै महिन्यात दापोलीत कडकडीत ऊन पडले होते.
त्यानंतर या आंब्याच्या झाडाला चांगलाच मोहोर आला. शिवाय नंतर आलेल्या पावसात तो टिकलादेखील! नवरात्रोत्सव सुरू होण्याच्या काही दिवस आधी आपण केवळ तुडतुड्यांकरिता औषधाची फवारणी केली. मात्र, कल्टार किंंवा अन्य कोणत्याही प्रकारची आपण या आंब्यावर फवारणी केलेली नाही. त्यांनी ५५ आंबे काढले आहेत. त्यांच्या मालकीची आंब्याच्या ४०० झाडांची बाग आहे. मात्र, यापैकी कोणत्याही झाडावर अजून फळधारणा झालेली नाही. केवळ त्यांच्या दारातील आंब्यावर सुमारे १०० फळे आल्याने आश्चर्य व्यक्तत करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
वेळेच्या आधी आलेला आंबा आपल्याला चांगला भाव देईल, असे त्यांना अनेकांनी सांगितले. मात्र, या आंब्यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अतिरिक्त उत्पन्नाची आस नसल्याचे ते सांगतात. याकरिता आपण स्वत: गाडी करून हे आंबे वाशी मार्केटला नेणार असल्याचे त्यांनी सांगितले. नरवणकर यांच्या नावाचा बॅ्रन्ड यापूर्वीच वाशी मार्केटमध्ये गाजत तयार आहे. गेल्या सुमारे ३० वर्षांपासून हा व्यवसाय ते करत आहेत. यावर्षी केवळ आपल्या गावाबरोबर दापोलीच्या नावावरही या विक्रमाचा शिक्का लागायला हवा, एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे.