दशावताराची परंपरा नवकलाकारांसाठी आव्हान

By admin | Published: November 11, 2015 10:09 PM2015-11-11T22:09:53+5:302015-11-11T23:39:02+5:30

जत्रोत्सवात वाढती मागणी : अभिनयाची लागणार कसोटी, त्रिपुरारी पौर्णिमेपासून गावागावात दहीकाला उत्सव

Dashavatara's challenge is to challenge the innovators | दशावताराची परंपरा नवकलाकारांसाठी आव्हान

दशावताराची परंपरा नवकलाकारांसाठी आव्हान

Next

सुनील गोवेकर -- आरोंदा --सध्या जिल्ह्यात संयुक्त दशावताराला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. किंबहुना ही नाटके तुडुंब प्रेक्षकांच्या उपस्थितीत सादर होत असल्याने ‘संयुक्त दशावतार’ हा दशावतारातील नवा ट्रेंड बनला आहे. त्यातच संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोगासाठी निमंत्रित केले जाणारे कलाकार हे जिल्ह्यातील नावाजलेले कलाकार असल्याने उच्चकोटीचा अभिनय पाहण्याची रसिकांना सवय लागून राहिली आहे. आता या महिन्याच्या शेवटी जिल्ह्यातील जत्रोत्सवांना प्रारंभ होणार असून, गावागावामधून होणाऱ्या या जत्रोत्सवात विविध दशावतारी नाट्यकंपन्यांचे कलाकार आपली दशावतारी कला सादर करणार आहे. यानिमित्ताने हे नव कलाकार संयुक्त दशावतारातून रसिकांच्या अभिनयासंबंधीच्या वाढलेल्या अपेक्षा कशा पूर्ण करणार याबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे.
दशावतार ही कोकणची प्रमुख लोककला आहे आणि या कलेकडे आजही लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन अतिशय चांगला आहे. जत्रोत्सवाबरोबरच वर्षभर चालणाऱ्या दशावतारी नाटकांना प्रेक्षकांची उपस्थिती कायमच मोठ्या प्रमाणात लाभत असते. आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातही पारंपरिक कला टिकवून ठेवण्यासाठी अनेक नवनवीन कलाकार दशावताराकडे वळत आहेत. त्याचीच परिणिती म्हणून आज जिल्ह्यात अनेक छोट्यामोठ्या दशावतारी नाट्य कंपन्या कला जिवंत ठेवण्याबरोबरच व्यावसायिक दृष्टीकोनातूनही दशावताराकडे पाहात आहेत. मात्र, संयुक्त दशावतार ही संकल्पना सुरू झाल्यानंतर प्रेक्षकांच्या कलाकारांकडून अपेक्षा वाढल्याचे चित्र आहे.
संयुक्त दशावतार ही संकल्पना सुरू झाल्यानंतर ज्याठिकाणी हा नाट्यप्रयोग असेल, त्याठिकाणी लांबून प्रेक्षक हजेरी लावतात. या दशावतारी नाटकातील कलाकारांचे द्वंद्व मग ते प्रसंगावधान असो, पुराणातील ज्ञानातील असो किंवा बुद्धीचातुर्याचे असो, यामुळे प्रेक्षकांचे मनमुराद मनोरंजन होते. संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोगांमधून आतापर्यंत सुधीर कलिंगण, पुरूषोत्तम खेडेकर, हरिश्चंद्र गावकर, आनंद नार्वेकर, दादा राणे (क ोनसकर), उदय राणे (कोनसकर), राधाकृष्ण नाईक, भरत नाईक, दत्तप्रसाद शेणई, बाबा मयेकर, संतोष रेडकर, राजू हर्याण, विठ्ठल गावकर, चारूहास मांजरेकर, प्रशांत मेस्त्री, ओमप्रकाश चव्हाण, सुधीर तांडेल, पप्पू नांदोसकर या व अशा इतर प्रतिभावान कलाकारांनी लोकांना दशावताराकडे खेचून आणले आहे.
पुराणातील ज्ञान, बुद्धिचातुर्य, प्रसंगावधान या महत्त्वाच्या असणाऱ्या आघाड्यांवर हे कलाकार परिपक्व असल्याचे दिसून येते.


कला सादर करणाऱ्यांसाठी लागणार कस
आता जत्रोत्सवांमध्ये दशावतारी कला सादर करणाऱ्या कलाकारांचा खरा कस लागणार आहे. कारण आजचा प्रेक्षक हा कौशल्यपूर्ण अभिनयाची आस असणारा आहे.
त्यामुळे दशावताराचा बदलता ट्रेंड नव कलाकार कसे टिकवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करून प्रेक्षकांना जागेवर बसवून ठेवणारा अभिनय त्यांना करावा लागणार, हे नक्की!

Web Title: Dashavatara's challenge is to challenge the innovators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.