मालवणात अद्ययावत जेटी, टर्मिनलचे काम युद्धपातळीवर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 02:52 PM2019-01-12T14:52:18+5:302019-01-12T14:54:40+5:30
मालवण येथील बंदर जेटी सुशोभिकरणातंर्गत टर्मिनल व अत्याधुनिक जेटीच्या सुमारे दहा कोटी रुपये खर्चाच्या कामास सुरुवात झाली आहे. या कामाचा अधिकृत शुभारंभ पालिका महोत्सवाच्या दरम्यान बंदरविकास राज्यमंत्री रवींद्र्र चव्हाण, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. मे अखेर हे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारास करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
मालवण : येथील बंदर जेटी सुशोभिकरणातंर्गत टर्मिनल व अत्याधुनिक जेटीच्या सुमारे दहा कोटी रुपये खर्चाच्या कामास सुरुवात झाली आहे. या कामाचा अधिकृत शुभारंभ पालिका महोत्सवाच्या दरम्यान बंदरविकास राज्यमंत्री रवींद्र्र चव्हाण, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. मे अखेर हे काम पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारास करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
मालवण येथील बंदर जेटी सुशोभिकरणातंर्गत सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी आमदार नाईक यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, आरोग्य सभापती पंकज साधये, बाबी जोगी, गणेश कुडाळकर, महेंद्र्र म्हाडगुत, स्वप्नील आचरेकर, सन्मेश परब तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते.
बंदर जेटी येथील टर्मिनल व अत्याधुनिक जेटीचे काम जलदगतीने सुरू आहे. या कामासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामास सुरुवात झाली असली तरी अधिकृत कामाचा शुभारंभ पालिका महोत्सवाच्या वेळी केला जाणार आहे. मे अखेरपर्यंत हे काम मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारास करण्यात आल्या आहेत. त्यानुसार संबंधित ठेकेदारानेही हे काम लवकरात लवकर पूर्ण करू असे स्पष्ट केले आहे.
बंदर जेटी परिसरात अतिक्रमणे झाली आहेत. अनधिकृत स्टॉल्स हटविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. बंदर जेटी सुशोभिकरणानंतर तेथील व्यावसायिकांना गाळे उपलब्ध करून दिले जातील. व्यावसायिकांनाही चांगली शिस्त लागावी यादृष्टीकोनातून आवश्यक ती कार्यवाही केली जाणार असल्याचेही आमदार नाईक यांनी सांगितले.