दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे...!

By admin | Published: January 10, 2016 11:25 PM2016-01-10T23:25:17+5:302016-01-11T00:42:23+5:30

मंगेश पाडगावकरांना आदरांजली : सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानातील कार्यक्रमाला रसिकांची दाद

The day is to bloom for you, to swallow ...! | दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे...!

दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे...!

Next

प्रसन्न राणे --सावंतवाडी -श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशीम धारा... उलगडला झाडातून अवचित हिरवा मोरपिसारा.., दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ््यावाचून झुलायचे..., असा बेभान हा वारा... या मंगेश पाडगावकरांच्या गाजलेल्या गाण्यांबरोबरच गझल व ताकदीचे शेर सादर करीत येथील जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानातील कार्यक्रम रंगतदार होत मोती तलावाचा काठ उजळून निघाला.
कविवर्य मंगेश पाडगावकर यांना आदरांजलीनिमित्त व त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ‘संवेदना’ सिंधुदुर्गतर्फे भोसले उद्यानात ‘शतदा प्रेम करावे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कविता व गीतांचे सादरीकरण करण्यात आले. पाडगावकरांच्या सर्वच गाजलेल्या गीतांच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक भारावून गेले.
श्रावणात घन निळा बरसला... हे गाणे योगेश कामत यांनी सादर करीत कार्यक्रमाची सुरूवात केली. यानंतर वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा... हे गाणे नेहा आजगावकर हिने सादर केले. यानंतर दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे..., असा बेभान हा वारा..., हात तुझ्या हातात..., धुंद ही हवा..., रोजचाच चंद्र हाच वाटतो नवा..., डोळ्यावरून माझ्या विसरून रात्र गेली.. वचने मला दिली विसरून रात्र गेली... आदी गाणी नेहा आजगावकर व योगेश कामत यांनी सादर केली. तर
गाण्यात सर्व माझ्या माझे किमान आहे, ज्याचे खरे न गाणे तो बेईमान आहे..., कोऱ्या कोऱ्या कागदावर असलं जरी छापलं.. ओठावर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं... ही पाडगावकर यांची गीते मालवणी कवी दादा मडकईकर यांनी सादर केली.
प्रा. अरूण पणदूरकर यांनी माझ्या प्रेमात जगणं सुंदर आहे..., मधुसूदन नानिवडेकर यांनी काळ्या काळ्या कपारीत कल्लोळ दुधाचा, एकाएकी पाऊस मधाचा... आदी गीते सादर केली. बाळकृष्ण मराठे यांनीही पाडगावकर यांच्या काही कविता सादर केल्या. ‘दार उघड चिऊताई चिऊताई दार उघड... आदी बोलगाणी कल्पना बांदेकर यांनी सादर केली. दिनेश केळूसकर यांनी ‘त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं.. करू दे की... त्यात तुमचं काय गेलं... एकदा ती त्याच्यासाठी वेडीपिशी झाली..पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली’ असे पाडगावकर यांनी लिहिलेली प्रेम कविता उत्कृष्टरित्या सादर करत उपस्थितांची दाद मिळविली.
यावेळी डॉ. विद्याधर करंदीकर यांनी पाडगावकर, विं. दा. करंदीकर व वसंत सावंत यांच्याशी जोडलेल्या आठवणी सांगितल्या. मंगेश पाडगावकर यांनी काव्यवाचनाचे गावोगावी कार्यक्रम केल्याने मराठी कविता टिकून राहिली. त्यामुळे आधुनिक कविता, गीते रसिकांच्या स्मरणार्थ राहिली. पाडगावकर हे स्वत: नाहीत, याची जाणीव अस्वस्थता निर्माण करणारी आहे. १९९२ च्या साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्षपद कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी भूषविले. ‘शुक्र तारा मंद वारा...’ या गीतामधून शुक्र या ग्रहाला तारा बनविण्याची किमया पाडगावकर यांनी साधली, असे करंदीकर यांनी सांगितले. यावेळी बांदेकर फाईन आर्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कॅलिग्राफीच्या माध्यमातून पाडगावकरांची व त्यांच्या गीतांची चित्रे रेखाटली. चित्रकार रामानंद मोडक, शैलजा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सर्व चित्रे रेखाटून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
कार्यक्रमास भाजपचे राज्यसरचिटणीस राजन तेली, जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, सावंतवाडी नगराध्यक्ष बबन साळगावकर, भाजप तालुकाध्यक्ष मनोज नाईक, मंदार कल्याणकर, प्रभाकर सावंत, आनंद नेवगी, अन्नपूर्णा कोरगावकर, बाळ पुराणिक, सिध्दार्थ भांबुरे, अशोक करंबळेकर, बाळकृष्ण मराठे, सनी काणेकर, नगरसेवक साक्षी कुडतरकर, अनारोजीन लोबो, क्षिप्रा सावंत, शर्वरी धारगळकर, योगिता मिशाळ उपस्थित होते.


राजकारण बाजूला...
भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर म्हणाले, कला आणि राजकारण नको तिथे आले, तर वेगळेच घडते. यामुळे सर्व राजकीय वलय बाजूला ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Web Title: The day is to bloom for you, to swallow ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.