भडगावचे दयानंद लोट भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त, २८ वर्षे बजावली देशसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 03:41 PM2020-07-07T15:41:20+5:302020-07-07T15:42:49+5:30
भारतीय सैन्यात गेली २८ वर्षे सेवा बजावणारे भडगाव बुद्रुकचे (ता. कुडाळ) सुपुत्र सुभेदार दयानंद राजाराम लोट हे सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झाले. यावेळी लष्कराचे सुभेदार मेजर नवीन नानैया यांच्या हस्ते लोट यांचा सत्कार करण्यात आला.
मालवण : भारतीय सैन्यात गेली २८ वर्षे सेवा बजावणारे भडगाव बुद्रुकचे (ता. कुडाळ) सुपुत्र सुभेदार दयानंद राजाराम लोट हे सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झाले. यावेळी लष्कराचे सुभेदार मेजर नवीन नानैया यांच्या हस्ते लोट यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जवान उपस्थित होते. आपल्या वडिलांप्रमाणेच देशसेवेचे व्रत हाती घेत सुभेदार बनलेल्या दयानंद लोट यांनी देशाच्या सीमेवर विविध
भागात देशरक्षणाचे काम करताना उल्लेखनीय कामगिरी बजावली.
कुडाळ तालुक्यातील भडगाव बुद्रुक येथे दयानंद यांचे प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण मालवण येथील माजी सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहात राहून पूर्ण केले. मालवणमधील भंडारी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये आणि महाविद्यालयीन पदवी शिक्षण स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात घेतल्यानंतर दयानंद हे वडीलांप्रमाणे देशसेवेकडे वळले. त्यांची २६ जून १९९२ रोजी सैनिक म्हणून भारतीय सैन्यात भरती झाली.
सैन्यात काम करताना त्यांनी जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, झारखंड, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, पुणे येथे देश रक्षणाचे काम केले. सैन्यात २८ वर्षे सेवा बजावल्यावर ते सुभेदार या पदावरून सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतर दयानंद हे पुण्यात स्थायिक झाले असून आपल्या दोन मुलींच्या शिक्षणासाठी वेळ देणार आहेत. सैन्यात देशसेवेचे कर्तव्य बजावताना त्यांना नेहमीच त्यांची पत्नी रेश्मा यांची मोलाची साथ लाभली आहे.
कार्य उल्लेखनीय
सात वर्षातच त्यांची पदोन्नती होऊन तकनिकी सुपरवायझर व पुढच्या तीन वर्षांत ज्युनिअर आॅफिसर म्हणून नियुक्ती झाली.
तर लढाऊ टँकचे विशेष प्रशिक्षण प्राप्त असल्याने दयानंद यांची टँकसोबत लढणाऱ्या दस्त्यासोबत कायमची नियुक्ती केली होती. त्यांचे सैन्य दलातील कार्य उल्लेखनीय आहे.