चराठा येथे भरदिवसा चोरी; रोख रक्कम लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 11:09 AM2020-01-28T11:09:19+5:302020-01-28T11:10:40+5:30
सावंतवाडी शहरात माजगाव व खासकीलवाडा परिसरातील भरदिवसा दोन घरफोडीच्या घटना ताज्या असतानाच त्याच दिवशी चराठा भागात आणखी एक घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. भरदिवसा तीन घरफोड्या झाल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.
सावंतवाडी : शहरात माजगाव व खासकीलवाडा परिसरातील भरदिवसा दोन घरफोडीच्या घटना ताज्या असतानाच त्याच दिवशी चराठा भागात आणखी एक घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. भरदिवसा तीन घरफोड्या झाल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.
चराठा येथे लवू राजाराम चव्हाण यांच्या घरी ही चोरी झाली असून, अज्ञात चोरट्याने सुमारे दहा हजारांची रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबतची तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चव्हाण हे सकाळी आपल्या पत्नीसमवेत कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान, ते शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घरी परतले असता त्यांना घराचा मागील दरवाजा उघडलेल्या अवस्थेत दिसला. चोरट्याने मागील दरवाजाची आतील कडी काढून आत प्रवेश करीत कपाटाच्या लॉकरमधील सुरक्षा कप्प्यातील दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली.
चोरीची घटना उघडकीस येताच त्यांनी रात्री उशिरा सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. शुक्रवारी दुपारच्या सत्रात चोरीच्या वृत्तामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. यात माजगाव-गरड व खासकीलवाडा येथील दोन्ही घरफोडीत सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे ८ लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता.
याबाबत भक्ती भरत गवस (रा. खासकीलवाडा) व अनुष्का आनंद देसाई (रा. माजगाव-गरड) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी तक्रार नोंदविली होती. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या हालचालींकडे चोरटे लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट होत आहे.