सत्ताधाऱ्यांमध्येच रंगतोय कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2016 10:33 PM2016-03-20T22:33:11+5:302016-03-20T23:49:00+5:30

वेंगुर्ले नगरपालिकेतील राजकारण : निमित्त उपनगराध्यक्ष निवडीचे

Dazzling Colts in Power | सत्ताधाऱ्यांमध्येच रंगतोय कलगीतुरा

सत्ताधाऱ्यांमध्येच रंगतोय कलगीतुरा

Next

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता असूनसुद्धा उपनगराध्यक्ष निवडीवेळी गटातटाच्या राजकारणाचा अभिषेक वेंगुर्लेकर यांना फायदा झाला होता. आता याच गटातटाच्या राजकारणाचा फटका उपनगराध्यक्ष वेंगुर्लेकर यांना बसला असून, त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली आहे. याच सत्ताधाऱ्यांनी गटाच्या फायद्यासाठी आपला वापर करून घेतला व आता आपल्यावर अविश्वास दाखविला असल्याचा आरोप वेंगुर्लेकर करीत आहेत. तर दुसरीकडे नगराध्यक्षांनी विशेष सभेपूर्वीच उपनगराध्यक्ष वेंगुर्लेकर यांचा राजीनामा स्वीकारल्याने राष्ट्रवादीचे गटनेते वामन कांबळे यांनी आक्रमक होत नगराध्यक्षांवरच पक्षामार्फत कारवाई करणार असल्याचे सांगितल्याने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच कलगीतुरा रंगला आहे. पुन्हा एकदा उपनगराध्यक्ष पदावरून सत्ताधाऱ्यांमध्येच गटातटाचे राजकारण पहायला मिळाल्यास नवल नाही.
वेंगुर्ले पालिकेत १७ पैकी १२ नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, एक राष्ट्रवादी काँग्रेसचा अपक्ष नगरसेवक, दोन भाजपचे, एक राष्ट्रीय काँग्रेसचा, तर एक मनसेच्या चिन्हावर निवडून आलेला नगरसेवक, असे पक्षीय बलाबल आहे. उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर हे मनसेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. राष्ट्रवादीचे पालिकेत बहुमत असूनही नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदांच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत फूट पडली होती. त्यावेळी दोन्ही गटांकडून व्हीपनाट्य रंगले होते. त्यानंतर दोन्ही गटांनी मंत्रालयात याविरोधात दाद मागितली होती. त्यावेळी पोटनिवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, राजकीय वजन वापरून दोन्ही गटांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला स्थगिती मिळाली व निवडणूक रद्द झाली. त्यानंतर झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक एक होऊन राष्ट्रवादीचे प्रसन्ना कुबल हे नगराध्यक्षपदी विराजमान झाले होते. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वामन कांबळे गटाच्या फिलोमिना कार्डोज यांचा या पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेऊन अभिषेक वेंगुर्लेकर यांना बिनविरोध निवडून आणले होते. दरम्यान, पालिकेतील राष्ट्रवादीच्या दोन गटांत सुरू असलेले व्हीपनाट्य थांबले होते. आता पुन्हा एकदा उपनगराध्यक्ष वेंगुर्लेकर यांना पदावरून हटविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचा व्हीप काढला होता, यावेळी राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांनी हा व्हीप स्वीकारला. राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीत नगरसेवकांबरोबरच नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल हेदेखील उपस्थित होते. सर्वांनी पक्षाच्या व्हीपचा आदर राखून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करायचे, असे ठरले होते.
वेंगुर्लेकर यांना उपनगराध्यक्ष पदावरून हटविण्यासाठी पालिकेतील १७ पैकी नम्रता कुबल, पूजा कर्पे, सुलोचना तांडेल, वामन
कांबळे, अन्नपूर्णा नार्वेकर, मनीष परब, अवधुत वेंगुर्लेकर, पद्मिनी सावंत, शैलेश गावडे, रमण वायंगणकर व काँग्रेसचे यशवंत ऊर्फ दाजी परब या ११ नगरसेवकांनी विशेष सभा बोलवावी, अशा मागणीचे पत्र नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांना दिले होते. मात्र, विशेष सभेपूर्वीच उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर यांनी आपला राजीनामा नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांच्याकडे सादर केला. त्यामुळे विशेष सभेवेळी वेंगुर्लेकर यांचा राजीनामा आपण मंजूर केल्याचे सांगून सभा संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे राष्ट्रवादीचे गटनेते वामन कांबळे यांच्यासह उर्वरित १० सदस्य विशेष सभेत आक्रमत होत सभेच्या नियमाप्रमाणे सभा चालविण्याची मागणी करू लागले. मात्र, नगराध्यक्ष कुबल हे आपल्या मताशी शेवटपर्यंत ठाम राहिले.
यावेळी आपल्याच पक्षाच्या गटनेत्याला अविश्वासाचा ठराव वाचन करण्यापासून रोखत खाली बसविले. राष्ट्रवादीच्या १२ नगरसेवकांनी व्हीपनुसार या अविश्वास ठरावास मंंजुरी दिली असती तर त्यात नगराध्यक्षांचाही समावेश असता.
हे रोेखण्यासाठी राजीनामा मंजुरीचे नाट्य नगराध्यक्षांनी केले असल्याचा आरोप गटनेते वामन कांबळे यांनी केला.
उपनगराध्यक्ष वेंगुर्लेकर यांनी सादर केलेला राजीनामा मंजूर करत नगराध्यक्षांनी दिलेल्या या दुटप्पी वागणुकीबाबत पक्षाकडून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात येणार आहे असे सांगितले होते. तर माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी काढलेल्या व्हीपचा अनादर करत गटनेत्यांनी स्वत:चा व्हीप बजाविला होता. यावरून वामन कांबळे यांनी केलेल्या पक्षविरोधी कामाची नगराध्यक्ष कुबल यांनी आठवण करून दिली. (प्रतिनिधी)

शहरवासीयांचे लक्ष
राष्ट्रवादीच्या या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून राजीनामा देत असल्याचे उपनगराध्यक्ष वेंगुर्लेकर यांनी सांगितले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांंमध्येच असलेल्या या परस्परविरोधी भूमिकांमुळे आता होणाऱ्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचेच दोन गट कशाप्रकारे खेळी करतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.


पक्षाच्या आदेशानुसार आम्ही काम करणार असून, यापुढे वेंगुर्ले नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचाच उपनगराध्यक्ष बसेल यासाठी प्रयत्नशील राहू.
- वामन कांबळे, गटनेते

Web Title: Dazzling Colts in Power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.