डीबीजे महाविद्यालयात २८पासून जिल्हा ग्रंथोत्सव
By Admin | Published: January 23, 2015 08:58 PM2015-01-23T20:58:08+5:302015-01-23T23:36:37+5:30
जिल्हा माहिती कार्यालय रत्नागिरी विभागीय शासकीय ग्रंथालय रत्नागिरी व डीबीजे महाविद्यालय चिपळूण हे सहआयोजक आहेत
चिपळूण : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव २०१४-१५ दि. २८ ते ३० जानेवारी या कालावधीत चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयाच्या संकुलात आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव समिती महोत्सवाचे आयोजक असून, जिल्हा माहिती कार्यालय रत्नागिरी विभागीय शासकीय ग्रंथालय रत्नागिरी व डीबीजे महाविद्यालय चिपळूण हे सहआयोजक आहेत. गंथ प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन बुधवार, दि. २८ रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी निशिकांत जोशी, विजय चोरमारे, चिपळूण येथील लोकमान्य टिळक वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे हे प्रमुख वक्ते असणार आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जगदीश राजापकर, खासदार विनायक राऊत, विधान परिषदेचे सदस्य निरंजन डावखरे, अनिल तटकरे, रामनाथ मोते, विधान सभेचे सदस्य भास्कर जाधव, उदय सामंत, राजन साळवी, सदानंद चव्हाण, संजय कदम, नगराध्यक्षा सावित्री होमकळस, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय काळमपाटील, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुचय रेडीज, डीबीजे महाविद्यालयाचे प्राचार्य श्याम जोशी, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक रजेसिंह वसावे हे उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ५ वाजता चिपळूणच्या स्थानिक कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह स्थानिक कलावंताचा सहभाग असणार आहे.
गुरुवार, दि. २९ रोजी सकाळी ११ वाजता ‘सामाजिक चळवळ व साहित्यिकांची भूमिका’ यावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी भालचंद्र दिवाडकर आहेत. सायंकाळी ४ वाजता साहित्यिक अरुण इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे काव्यसंमेलन होणार आहे. शुक्रवार दि. ३० रोजी सकाळी १० वाजता साहित्य जत्रा कार्यक्रमात साहित्यिक चर्चा व कवीसंमेलन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सुहास बारटक्के असणार आहेत. ग्रंथोत्सवाचा समारोप सायंकाळी ४ वाजता प्राचार्य श्याम जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
परिसरात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात शासकीय मुद्रणालय, कोल्हापूर यांच्यासह प्रमुख प्रकाशक सहभागी होणार आहेत. ग्रंथोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)