मृत महिला जखमीची पत्नी नाही, बेळगावमधील रहिवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 05:21 PM2020-03-20T17:21:30+5:302020-03-20T17:23:17+5:30
आंबोली येथे बुधवारी सायंकाळी अपघातानंतर कारने पेट घेतला होता. मात्र, प्रसंगावधान राखत कारच्या चालकाने बाहेर उडी मारल्याने सुदैवाने तो बचावला. कारमध्ये असलेली महिला अडकून पडल्याने ती पूर्णत: जळाली आणि त्यात मृत पावली होती.
सावंतवाडी : आंबोली येथे बुधवारी सायंकाळी अपघातानंतर कारने पेट घेतला होता. मात्र, प्रसंगावधान राखत कारच्या चालकाने बाहेर उडी मारल्याने सुदैवाने तो बचावला. कारमध्ये असलेली महिला अडकून पडल्याने ती पूर्णत: जळाली आणि त्यात मृत पावली होती.
या दोघांची ही नावे निष्पन्न करण्यात गुरूवारी पोलिसांना यश आले असून यातील मृत महिला रिझवाना अस्लम पाथरवाट (४५, रा. कंग्राळगल्ली बेळगाव) जखमी चालक दुड्डाप्पा बांगरप्प पद्दण्णवार (४७, रा. बेळगाव) असे आहे. मृत महिलेचा दुडाप्पा हा कौटुंबिक डॉक्टर असून, त्याच्या सोबत ती सिंधुदुर्गमध्ये आली होती.
दोन दिवस सिंधुदुर्ग मधील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होती. पोलिसांनी प्रथम दर्शनी अपघाताचाच गुन्हा दाखल केला असून, अद्याप पर्यंतच्या तपासात कोणताही घातपात नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
आंबोलीतील मुख्य धबधब्याच्या ठिकाणी कार चालक दुडाप्पा पद्दणवार याने आंबोलीच्या दिशेने येणाऱ्या चौकुळ येथील सत्यप्रकाश गावडे यांच्या कारला धडक दिली आणि तो सुसाट कार सावंतवाडीच्या दिशेने घेऊन निघाला होता. मात्र, धबधब्या पासून काही अंतरावर कारचा मोठा स्फोट झाला आणि कारने पेट घेतला.
प्रसंगावधान राखत दुडाप्पा याने कारमधून बाहेर उडी मारली. मात्र, रिझवाना ही कारमध्येच अडकून पूर्णत: जळाली आणि मृत पावली. जखमी दुडाप्पा याला गोवा बांबुळी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृत रिझवाना हिचे नातेवाईक दुपारी आंबोलीत दाखल झाले. तिचा जावई हा कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे असतो. तर तिचा मुलगा मद्रास येथे नोकरीनिमित्त असल्याचे पोलिसांनी सांगितले. महिलेचा मृत नातेवाईकांनी ताब्यात घेऊन ते बेळगावकडे रवाना झाले आहेत.
जखमी दुडाप्पा हा डॉक्टर असल्याने मृत रिझवाना पाथरवाट यांचे कुटुंब त्यांना ओळखायचे रिझवाना यांना दोन मुले यातील मुलगीचे लग्न झाले आहे. तर मुलगा नोकरीनिमित्त मद्रास येथे असतो. त्यामुळे रिझवाना ही बेळगाव येथे एकटीच रहायची. त्यामुळे दुडाप्पा हा कौटुंबिक डॉक्टर असल्याने त्याच्या सोबत गेले दोन दिवस ती सिंधुदुर्गमध्ये आली होती.
त्यातील एक दिवस आंबोली तर दुसऱ्य दिवस मालवण वायरी येथे वास्तव्यास होती. दोन्ही हॉटेलमध्ये पती पत्नी असल्याचे सांगूनच वास्तव्यास असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. तसेच महिलेच्या नातेवाईकांनीही अद्यापपर्यंत कोणतीही तक्रार दिली नाही. त्यामुळे कारचालक जखमी दुडाप्पा पद्दण्णवार यांच्यावर हयगयीने अविचाराने गाडी चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सावंतवाडी पोलिसांनी सांगितले.
माझ्या बायकोला वाचवा : दुडाप्पाची आर्त हाक
अपघातानंतर दुडाप्पा याने कारमधून उडी मारल्यानंतर दुडाप्पा हा अनेक गाड्यांना थांबवून कारमध्ये माझी बायको आहे. तिला वाचवा असे सांगत होता. तर रूग्णालयात दाखल केल्यानंतर ही तो सतत माझ्या बायकोला वाचवा असेच सांगत होता. त्यामुळे आता नेमका प्रकार काय हे जखमी दुडाप्पाच सांगू शकेल, सध्या तो उपचार घेत असल्याने त्याचा जबाब घेण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.