बसच्या धडकेने खेळाडू युवतीचा मृत्यू
By admin | Published: December 9, 2015 01:12 AM2015-12-09T01:12:34+5:302015-12-09T01:14:28+5:30
अमरावती विद्यापीठाच्या संघावर शोेककळा
रत्नागिरी : अमरावती विद्यापीठाच्या कबड्डी संघातील दोन खेळाडू युवतींना भरधाव बसने धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाल्याची दुर्घटना सोमवारी रात्री ९.२0 च्या सुमारास घडली. दुसऱ्या जखमी युवतीवर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पूजा विनायक आगरकर (वय १९, यवतमाळ) असे मृत युवतीचे नाव आहे.
शहरातील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धा सुरू आहेत. सोमवारी रात्री अमरावती विद्यापीठाचे खेळाडू जेवणासाठी पोलीस मुख्यालयानजीकच्या खानावळीमध्ये गेले होते. जेवण आवरून विद्यार्थिनी परत येत होत्या. जेलनाका येथील मुख्य रस्ता ओलांडताना आंबेकोंड ते रत्नागिरी या बसने (एमएच-२०-बीएल-०७५१) त्यांना धडक दिली. या अपघातामध्ये डोक्याला जबर मार बसलेली पूजा विनायक आगरकर जागीच ठार झाली, तर तिची सहखेळाडू प्रियांका प्रकाश काळे (१९) ही जखमी झाली.
दोघींनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. काही मिनिटांमध्ये या घटनेची माहिती शहर आणि परिसरामध्ये कळताच नागरिकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली होती. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत पूजा मृत झाल्याचे जाहीर केले नव्हते. रात्री उशिरा जमाव शांत झाल्यानंतर अखेर ही बाब जाहीर करण्यात आली.
तुषार जगनराव अडसुळे (४२, अमरावती) यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची तक्रार दिली आहे.
त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी शहरी बसचे चालक प्रमोद मनोहर सावंत (५६, एस. व्ही. रोड, विश्वनगर, रत्नागिरी) यांना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. (वार्ताहर)
पूजाचा मृतदेह यवतमाळकडे
पूजा आणि प्रियांकाला बसने धडक दिल्यानंतर एकच गोंधळ झाला. या दोघींच्या मैत्रिणींना या अपघाताचा मोठा धक्का बसला. सर्वजण तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. उशिरापर्यंत सर्वजण रुग्णालयातच होते. आवश्यक सोपस्कार झाल्यानंतर रात्री उशिराने पूजा आगरकरचा मृतदेह ताब्यात देऊन यवतमाळकडे पाठविण्यात आला.
कबड्डी स्पर्धेला स्थगिती
या अपघातानंतर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरील सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेला पूर्णत: स्थगिती देण्यात आली.
चालक निलंबित
या अपघाताला जबाबदार असलेल्या चालकाला आमच्यासमोर हजर करा, अशी मागणी अपघातानंतर जिल्हा रुग्णालयात जमा झालेल्या लोकांनी केली. योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर जमाव शांत झाला. या अपघाताला जबाबदार धरून बसचे चालक प्रमोद मनोहर सावंत यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले आहे.