रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, वनविभागाने केले अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 10:36 AM2019-04-23T10:36:04+5:302019-04-23T10:37:47+5:30
रेल्वेची धडक बसून शनिवारी सायंकाळी आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना कोकिसरे बांधवाडी येथील विठ्ठल मंदिरानजीक घडली. गुरुवारी सकाळी कोकिसरे नारकरवाडीनजीक बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ तिसऱ्या दिवशी दुसरी घटना घडली आहे. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा वनविभागाने बिबट्यावर अंत्यसंस्कार केले.
वैभववाडी : रेल्वेची धडक बसून शनिवारी सायंकाळी आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना कोकिसरे बांधवाडी येथील विठ्ठल मंदिरानजीक घडली. गुरुवारी सकाळी कोकिसरे नारकरवाडीनजीक बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ तिसऱ्या दिवशी दुसरी घटना घडली आहे. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा वनविभागाने बिबट्यावर अंत्यसंस्कार केले.
कोकिसरे बांधवाडी येथील काही ग्रामस्थांना शनिवारी दुपारनंतर रेल्वे ट्रॅकपासून काहीसे लांब असलेल्या विठ्ठल मंदिरानजीक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्यामुळे ग्रामस्थांनी ही माहिती वनविभागाला दिली. ही माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एस. बी. सोनवडेकर, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक पी. डी. पाटील, वनमजूर चंद्रकांत मराठे हे घटनास्थळी पोहोचले.
मृतावस्थेत आढळलेली ती बिबट्याची मादी होती. तिला गंभीर दुखापत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बिबट्याच्या मादीला रेल्वेची धडक बसली असावी असा वनविभागाचा अंदाज आहे. त्यामुळेच तिचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त केली. मादी बिबट्याचे वय अंदाजे पाच वर्षे होते. मृत बिबट्यावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
बिबट्याची मृत मादी मृत बछड्याची आई?
कोकिसरे परिसरात एक मादी बिबट्या आणि दोन बछड्यांचा वावर होता अशी माहिती वनविभागाला होती. त्यापैकी एका बछड्याचा दोन दिवसांपूर्वी रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला होता. तर शनिवारी मृतावस्थेत आढळलेली मादी ही त्या बछड्याची आई असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली.