गवसच्या मृत्यूचे गूढ कायम
By admin | Published: February 19, 2015 10:37 PM2015-02-19T22:37:58+5:302015-02-19T23:45:04+5:30
पोलिसांचा शोध कायम : डायस याची भूमिका संशयास्पद
दोडामार्ग : खोक्रल येथील शिवप्रसाद कृष्णा गवस (वय २५) यांच्या संशयास्पद मृत्यूमागचे गुपीत उलगडण्यात पर्वरी (गोवा) पोलिसांना अद्याप यश मिळाले नसून, मृताचा मित्र अॅल्डन डायस याची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. अॅल्डन हा देत असलेली माहिती विसंगत वाटत असून, शिवप्रसादच्या संशयास्पद मृत्यूमागे अॅल्डन याचाही सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे पर्वरी पोलिसांसमोर शिवप्रसादच्या मृत्यूमागचे कारण उलगडण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. पेशाने वैद्यकीय अधिकारी असलेल्या शिवप्रसाद गवस यांचा तीन दिवसांपूर्वी पणजी येथील मांडवी नदीत पोर्ट जेटीनजीक संशयास्पद मृतदेह आढळला होता. प्रथमदर्शनी आत्महत्या केली असल्याचा तर्क व्यक्त केला जात होता. मात्र, मृतदेह मिळाल्यानंतर त्याच्या छातीवर रक्ताचे डाग आढळल्याने तसेच तोंडात एकही दात शिल्लक नसल्याने त्याचा घातपात झाल्याचा संशय बळावला. शिवप्रसाद याचे गोव्यातीलच आणि त्याच्याबरोबरच शिक्षण घेणाऱ्या मुलीशी पे्रमसंबंध होते. हे मुलीच्या कुटुंबियांना व मुलीच्या बहिणीच्या नवऱ्याला मान्य नव्हते. शिवाय मुलीच्या बहिणीच्या नवऱ्याने शिवप्रसाद याला मारण्याची धमकी देखील शिवप्रसादच्या वडिलांना दिली होती. त्यामुळे त्यानेच शिवप्रसादला मारून त्याचा मृतदेह पणजी पुलावरून मांडवी नदीत फेकला असावा आणि या कामी त्याचा मित्र अॅल्डन डायस याने त्याला मदत केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.
अॅल्डन डायस याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी अॅल्डन डायस याच्यासमवेत शिवप्रसाद बागा बीचवर होता. त्यावेळी डायससोबत आणखी दोन डायसचे मित्र, पण शिवप्रसाद ओळखत नसलेले उपस्थित होते. बागा बीचवर पहाटे ४ वाजेपर्यत या चौघांनी पार्टी केली. त्यानंतर डायस आणि शिवप्रसाद ओल्ड गोवा येथे हॉस्टेलवर गेले. त्या ठिकाणी पोहोचल्यावर शिवप्रसाद याने सिगारेटचे पाकिट आपण मांडवी पुलावर विसरलो आहे. ते आणण्यासाठी जातो, असे सांगितले तो आलाच नाही, अशी माहिती डायस याने दिली.
मात्र, मृताच्या कुटुंबियांच्या मतानुसार, शिवप्रसाद हा कधी धूम्रपान करीत नव्हता. शिवाय अॅल्डॉनप याने एकट्यालाच पाकिट आणण्यासाठी शिवप्रसादला कसे काय पाठविले आणि केवळ सिगारेटच्या पाकिटासाठी तो एवढ्या लांब का जाईल, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे मृताच्या कुटुंबियांनी अॅल्डनच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला असून, या प्रकरणात त्याचादेखील हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)
मृतदेहाकडे ‘अॅल्डन’ने फिरविली पाठ
मृत शिवप्रसाद गवस याचा मृतदेह मांडवी नदीत शोधण्याचे काम सतत तीन दिवस सुरू होते. या तीन दिवसात मृताच्या अनेक मित्रांनी त्याच्या शोधकार्यात सहभाग घेतला. शिवाय अधूनमधून शिवप्रसादच्या कुटुंबियांकडे चौकशीदेखील करीत होते.
ज्या दिवशी मृतदेह सापडला, त्या दिवशी शिवप्रसादचे मित्रमैत्रिणी मृतदेह पाहण्यासाठी पोर्ट जेटीनजीक जमले होते. मात्र, अॅल्डन डायस याने मृतदेहाकडे पाठ फिरविली. तसेच साधी चौकशीदेखील केली नाही.
सीसीटीव्ही फुटेज ठरणार महत्त्वाचे
पणजी पुलावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये शिवप्रसादने आत्महत्या केली की त्याला कोणी आणून टाकले, हे कैद झाले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या
माध्यमातूनच शिवप्रसादच्या मृत्यूमागचे कारण उलगडण्यास पोलिसांना मदत होणार आहे.