गावराई तेलीवाडी येथील घटना, विहिरीत पडून मृत्यू वृद्ध दांम्पत्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 06:19 PM2019-01-31T18:19:08+5:302019-01-31T18:20:18+5:30
परसबागेत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत असताना कठडा नसलेल्या विहीरित पडून गावराई तेलीवाडी येथील हरिश्चंद्र नारायण मयेकर (७०) आणि वैजयंती हरिश्चंद्र मयेकर (६८) या वृद्ध दांपत्याचा मृत्यु झाला आहे. या घटनेमुळे मयेकर कुटुंबासह गावराई गावावर शोककळा पसरली आहे.
सिंधुदुर्गनगरी : परसबागेत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत असताना कठडा नसलेल्या विहीरित पडून गावराई तेलीवाडी येथील हरिश्चंद्र नारायण मयेकर (७०) आणि वैजयंती हरिश्चंद्र मयेकर (६८) या वृद्ध दांपत्याचा मृत्यु झाला आहे. या घटनेमुळे मयेकर कुटुंबासह गावराई गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कुडाळ तालुक्यातील गावराई तेलीवाडी येथे राहणाऱ्या मयेकर दांपत्याने आपल्या परस बागेतील पाला पाचोळा जाळण्यासाठी बुधवार ३० जानेवारी रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास आग घातली होती. मात्र ही बघता बघता अन्यत्र पसरु लागली. ही आग आटोक्यात आणण्यासाठी वृद्ध मयेकर दांपत्य प्रयत्न करत होते.
पेटवलेली आग विहीरीवर बसविण्यात आलेल्या पाण्याच्या पंपाकडे सरकत होती. ही आग पंपाकड़े जाऊन धोका होऊ नये यासाठी आग विझविण्यासाठी हरिश्चंद्र मयेकर व वैजयंती मयेकर विहिरीजवळ गेले होते. मात्र या घाईगडबडित तोल जावून कठडा नसलेल्या विहीरित पडून मयेकर दाम्पत्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे.
परस बागेला लागलेली आग पाहता शेजारी राहणाऱ्या जगताप कुटुंबाने मयेकर यांना फोन केला होता. मात्र फोन उचलत नसल्याने त्यांनी मयेकर यांच्या घरी जावून पाहणी केली असता ते घरात दिसून आले नाहीत. आजूबाजूला पाहिले असता मयेकर दाम्पत्याचा विहीरित पडून मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
याबाबतची माहिती जगताप यांनी पोलीस पाटील यांना दिली. त्यांनी लागलीच याबाबत ओरोस पोलीसांना कल्पना दिली. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद पवार, पोलीस उपनिरीक्षक रवि जाधव, पोलिस हवालदार एम. एन. पडणेकर, आर. के. राठोड, पोलीस नाईक आशिष शेलटकर यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थ शुभम राठीवडेकर यांच्या मदतीने मयेकर दाम्पत्याचे मृतदेह विहिरीबाहेर काढून घटनेचा पंचनामा केला.
मृत मयेकर यांच्या डोक्याला मार लागलेला दिसून येत आहे. त्यामुळे पत्नीला वाचविण्यासाठी विहिरीमध्ये उतरत असताना हात सुटुन ते विहिरीच्या दगडाला आपटले असावेत आणि पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला असा अंदाजही पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. मयेकर यांच्या पश्चात विवाहित दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे.