पडवे येथील महिलेचा माकडतापाने मृत्यू
By admin | Published: June 16, 2016 11:49 PM2016-06-16T23:49:48+5:302016-06-17T00:24:18+5:30
आठवड्यात दुसरा बळी : रुग्ण वाढल्याने भीती
बांदा : बांदा परिसरातील गावांमध्ये माकडतापाने थैमान घातले असून, गुरुवारी पडवे-धनगरवाडी येथील सुगंधी लक्ष्मण घारे (वय ५0) या महिलेचा बळी घेतला. गेल्या सहा दिवसांतील माकडतापाचा सावंतवाडी तालुक्यातील हा दुसरा, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण सातवा बळी आहे.
सुगंधी घारे यांच्यावर गोवा-बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू होते. सावंतवाडी व दोडामार्ग तालुुक्यांमधील गावांमध्ये माकडतापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्याने खळबळ उडाली असून, आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
सुगंधी घारे यांना उलट्या होत असल्याने त्यांना बुधवारी (दि. ८) मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांना घरी पाठविण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले. त्यांना ताप व उलटीचा त्रास असल्याने अधिक उपचारांसाठी सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. सोमवारी (दि. १३) तेथील प्रयोगशाळेत त्यांच्या रक्ताच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. तेथे त्यांना माकडताप झाल्याचे निदान करण्यात आले. त्यांची प्रकृती अधिकच ढासळल्याने त्यांना लागलीच अधिक उपचारांसाठी गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
तेथे त्यांच्यावर गेले दोन दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचे गोवा-बांबोळीरुग्णालयात निधन झाले. सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावातील सोनू देसाई यांचे पाच दिवसांपूर्वी माकडतापाने निधन झाले. त्यानंतर डेगवे गावात दोन रुग्ण माकडतापाने बाधित सापडले होते. तालुक्यातील डेगवे, तांबोळी, असनिये, पडवे येथे तापाचे संशयित रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेने खबरदारी म्हणून या गावांमधील घराघरांत सर्वेक्षण सुरू केले आहे. गुरुवारी सायंकाळी सुगंधी घारे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, दीर, जावा, पुतणे असा परिवार आहे. (प्रतिनिधी)
आरोग्य विभागातर्फे परिसरात सर्वेक्षण
आठवड्यात दुसरा बळी गेल्याने आरोग्य विभागातही खळबळ माजली आहे. तर तालुक्यातील डेगवे, तांबोळी, असनिये, पडवे येथे तापाचे संशयित रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेने खबरदारी म्हणून या गावांमधील घराघरांत पुन्हा सर्वेक्षण सुरू केले आहे.
पडवे गाव हे मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत येते. डेगवेसह पडवे गावात आरोग्य विभागाच्या पथकाकडून सर्वेक्षण सुरू आहे. तापाचा संशयित रुग्ण सापडल्यास ताबडतोब त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. मात्र, अद्याप संशयित रुग्ण सापडला नाही. तसेच जे रुग्ण माकडतापातून पूर्णपणे बरे झाले आहेत, त्यांच्यादेखील संपर्कात राहून त्यांची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
- डॉ. मेघा अंधारी,
वैद्यकीय अधिकारी