corona virus :खारेपाटणमधील त्या युवकाचा मृत्यू कोरोनानेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 04:49 PM2020-08-19T16:49:52+5:302020-08-19T16:51:35+5:30
कणकवली तालुक्यातील खारेपाटण कोंडवाडी येथील १८ वर्षीय युवकाचा शनिवार १५ आॅगस्ट रोजी शरीरातील पेशींचे प्रमाण कमी झाल्याने तसेच तापसरीने जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. सोमवारी रात्री उशिरा आलेल्या स्वॅब अहवालानुसार त्या युवकाचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे खारेपाटणमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खारेपाटण : कणकवली तालुक्यातील खारेपाटण कोंडवाडी येथील १८ वर्षीय युवकाचा शनिवार १५ आॅगस्ट रोजी शरीरातील पेशींचे प्रमाण कमी झाल्याने तसेच तापसरीने जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. सोमवारी रात्री उशिरा आलेल्या स्वॅब अहवालानुसार त्या युवकाचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे खारेपाटणमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खारेपाटण कोंडवाडी येथील रिक्षा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाचा मुलगा पाच ते सहा दिवस तापाने आजारी होता. शेवटच्या क्षणी नाईलाज झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांच्यावतीने त्याला शासकीय रुग्णालय खारेपाटण येथे नेण्यात आले होते. त्याची अवस्था बिकट असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता कणकवली उपजिल्हा रुग्णालयात व त्यानंतर जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलविण्यात आले. त्यापूर्वी खारेपाटण तपासणी नाका येथील रॅपिड टेस्ट सेंटरमध्ये १४ रोजी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. तो निगेटिव्ह आला होता. जिल्हा रुग्णालय येथे पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर काही तासांनी त्याचा मृत्यू झाला होता.
त्याचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा बाकी होता. मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबातील व्यक्ती व नातेवाईक यांनी त्या युवकाचा मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यापूर्वी आरोग्य विभागाच्यावतीने मृत युवकाचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा बाकी असल्याची माहिती कुटुंबातील व्यक्तींना दिली होती व त्यानुसार योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना केल्या होत्या.
खारेपाटण कोंडवाडी येथे कोविड-१९ चे सर्व नियम पाळून त्या युवकावर कुठल्याही प्रकारचे धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्या युवकाच्या मृत्यूच्या धक्क्यातून कुटुंबीय सावरत नाहीत तोपर्यंत दोन दिवसांत लगेच या मृताचा कोरोना अहवाल आरोग्य विभागाकडून आला. त्यामुळे कुटुंबातील नातेवाईकांना दु:खापेक्षा त्यानंतर निर्माण होणारी सामाजिक परिस्थिती फार वाईट असते याची भीती वाटायला लागली.
खारेपाटण कोंडवाडी येथील युवकाचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तालुका पातळीवरून आरोग्य विभागाची एक टीम दुपारनंतर खारेपाटण कोंडवाडी येथे दाखल झाली होती. येथील भागाचा सर्व्हे करून येथील नागरिकांच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टीने अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.