सिंधुदुर्गातील लाभार्थ्यांना समता सप्ताहात कर्जवाटप
By admin | Published: April 10, 2017 03:59 PM2017-04-10T15:59:51+5:302017-04-10T15:59:51+5:30
महामंडळाच्या विविध योजनांची दिली माहिती
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. १0 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या दुस-या दिवशी ओरोस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे विविध आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्जाचे वितरण करण्यात आले. यावेळी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक संचालक जयंत चाचरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अग्रणी बँकेचे व्यवस्थापक किशोर जाधव, श्यामराव पेजे कोकण इतर मागास वर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक नंदकिशोर साळसकर, संत रोहिदास चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळाचे प्रभारी जिल्हा व्यवस्थापक सुनील निकम, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापिका शुभांगी नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक संचालक जयंत चाचरकर यांनी समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांची माहिती जिल्हा व्यवस्थापक नंदकिशोर साळसकर यांनी दिली.
अग्रणी बँक व्यवस्थापक किशोर जाधव यांनी बँकांच्या विविध योजनांची माहिती दिली. संत रोहिदास चर्मोद्योग आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती प्रभारी जिल्हा व्यवस्थापक सुनील निकम यांनी दिली, तर महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांची माहिती जिल्हा व्यवस्थापिका शुभांगी नाईक यांनी दिली.
यावेळी महात्मा फुले महामंडळाच्या कर्जयोजनेतून मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आले. दत्तात्रय कदम यांना लाऊड स्पीकर व्यवसायासाठी, स्वप्नील कदम यांना रेडियम आर्ट व्यवसायासाठी, ममता काटकर यांना कपडे विक्री व्यवसायासाठी, सुनील काटदर यांना रेडियम व्यवसायासाठी, तर मनोज काळसेकर यांना मोबाईल शॉपी व्यवसायासाठी अर्थसहाय्य करण्यात आले. प्रास्ताविक विष्णू तेंडोलकर यांनी केले व त्यांनीच आभार मानले.