गडकरींच्या उपस्थितीत चौपदरीकरणाबाबत निर्णय
By admin | Published: January 23, 2016 11:35 PM2016-01-23T23:35:12+5:302016-01-23T23:35:12+5:30
चंद्रकांतदादा पाटील : महामार्ग भूसंपादन प्रक्रियेबाबत वेधले लक्ष
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबतच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत काँगे्रसवाले जनतेला उगाचच भडकावीत आहेत, अशी तक्रार सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ येथील भेटीदरम्यान करीत शहरी व ग्रामीण भूसंपादन निश्चित करावे, असे आवाहन केले. यावेळी बांधकाममंत्री पाटील यांनी, महामार्गासंदर्भातील सर्व प्रश्न व समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी सिंधुदुर्गात येत असून, यावेळी योग्य तो निर्णय घेऊ, असे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले.
कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृहावर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहकार, पणन क्षेत्रातील तसेच महामार्ग विभाग यांच्या सोबत बैठकीचे आयोजन केले. यावेळी भाजप पदाधिकारी यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या प्रक्रियेबाबत काँग्रेसवाले जनतेला उगाचच भडकावत आहेत. येथील महामार्गाचे भूसंपादन हे शहरी भागात ४५ मीटर, तर ग्रामीण भागात ६० मीटर असे असतानाही कणकवली शहरात ४५ मीटर भूसंपादन आहे. मात्र, त्यापुढे जानवली हे ग्रामीण क्षेत्रात येत असूनही तेथे ४५ मीटर एवढेच भूसंपादन केले जात आहे. हा प्रकार म्हणजे इतर ग्रामीण भागांवर अन्याय आहे. असे करायचे असेल, तर सर्वच ग्रामीण भागात ४५ मीटर भूसंपादन करा, अशी मागणी केली.
यावेळी बोलताना बांधकाममंत्री पाटील म्हणाले, महामार्गाच्या आराखड्यात मी बदल करू शकत नाही. २९ जानेवारी रोजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी रत्नागिरी येथे येत असून, ते आल्यावर यावर योग्य तो निर्णय होईल. राष्ट्रीय सहकार विकास निगमच्यावतीने ज्यांनी काजू प्रक्रियेत उद्योग उभारलेत व त्यापैकी जिल्ह्यातील २२ व रत्नागिरीतील दोन असे मिळून २४ प्रकल्पग्रस्तांनी कर्जाची रक्कम सहा महिन्यांत भरण्याचे लेखी द्या. मी त्यांच्या कर्जावरील व्याज माफ करीन, असे सांगितले.
राणे हॉटेल वाचविताहेत
या भेटीत भाजप पदाधिकाऱ्यांनी जानवलीमध्येच ग्रामीण भाग असूनही ४५ मीटर जमीन का घेण्यात येणार आहे. राणेंनी आपले हॉटेल वाचविले आहे. जानवलीतील भूसंपादन हे ६0 मीटरच झाले पाहिजे, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्याकडे केली.