जिल्ह्यात युतीचा निर्णय स्थानिक पातळीवर
By admin | Published: January 29, 2017 10:49 PM2017-01-29T22:49:34+5:302017-01-29T22:49:34+5:30
माधव भंडारी ; युती न झाल्यास शिवसेना जबाबदार
वैभववाडी : जिल्हास्तरावर मित्रपक्षांशी युती करण्याचे अधिकार प्रदेश भाजपने स्थानिक नेतृत्वाला दिले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गातील युतीबाबतचा निर्णय जिल्हा कार्यकारिणी घेईल, असे प्रतिपादन भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी रविवारी सायंकाळी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. जिल्ह्यात युती व्हावी अशी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. युती झाली नाही, तर त्याच्या परिणामांची जबाबदारी शिवसेनेची असेल, असेही ते म्हणाले.
एका कार्यक्रमानिमित्त वैभववाडीत आले असता भंडारी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे आदी उपस्थित होते. भंडारी पुढे म्हणाले की, राज्यात युती व्हावी, असा काही जिल्ह्यांचा आग्रह होता. त्यापैकीच सिंधुदुर्गही एक आहे. त्यामुळे शिवसेनेसह आरपीआय, रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्याशी युती करण्यासंबंधीचे सर्वाधिकार प्रदेश भाजपने जिल्हास्तरावर सोपविले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील युतीचा निर्णय भाजप, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घ्यावा. शिवसेनेच्या भूमिकेमुळे युती झाली नाही, तर होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी शिवसेनेची राहील, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, सत्तेतील घटक पक्षांशी युती करताना प्रदेशच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. मात्र, अन्य स्थानिक पातळीवरील आघाडीबाबत पूर्वपरवानगी घ्यावी, असे प्रदेश भाजपचे धोरण आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत युती सोडाच पूर्वपरवानगीची विचारणाही करू नये, अशा सूचना जिल्हा कार्यकारिणींना दिल्या आहेत. शिवसेनेने युती केली नाहीच तर भाजप जिल्ह्यात सर्व जागा स्वबळावर लढणार का? असे विचारले असता ‘तो निर्णय जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार घेतील’, असे भंडारी यांनी स्पष्ट केले.
देवतांचे पत्रक हा खोडसाळपणा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २००२ च्या परिपत्रकाचा आधार घेऊन एका कक्ष अधिकाऱ्याने हेतूपूर्वक पत्र बाहेर काढून खोडसाळपणा केला. ते शासनाचे परिपत्रक नव्हते. तरीही गैरसमज होऊ नये म्हणून राज्य शासनाने तातडीने अधिकृत परिपत्रक काढून खुलासा केला. त्यामुळे शिवसेनेने जे बाहेर पसरवले ते अपुऱ्या माहितीच्या आधारे निवडणुकीचे वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होता. तसे नसेल तर शिवसेनाही सत्तेत आहे. त्यांनी आपल्या मंत्र्यांनाच जाब विचारावा, असे आवाहन भंडारी यांनी केले. (प्रतिनिधी)
नारायण राणेंचे ‘ईडी’ प्रकरण ही वस्तुस्थिती
छगन भुजबळांनंतर काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री व आमदार नारायण राणे ‘ईडीच्या रडारवर’ असे वृत्त महिनाभरात दुसऱ्यांदा पसरविण्यात आले आहे. त्याबाबत विचारले असता, निवडणुका लागल्या की, अशा बातम्या येतच असतात.
भुजबळांशेजारी अनेक खोल्या रिकाम्या आहेत, असे मिश्कील उत्तर देत राणेंची चौकशी सुरू आहे, असे मी म्हणणार नाही आणि चौकशी सुरू नाही असेही नाही. मात्र, नारायण राणे यांचे ‘ईडी’ प्रकरण ही ‘वस्तुस्थिती’ आहे, असे भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले.