पालकमंत्र्यांचा निर्णय एकतर्फी : साळगावकर
By admin | Published: April 23, 2017 11:47 PM2017-04-23T23:47:23+5:302017-04-23T23:47:23+5:30
दफनभूमीप्रकरणी आज आत्मक्लेष आंदोलन
सावंतवाडी : दफनभूमी प्रकरणात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेला निर्णय हा एकतर्फी आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे त्यांच्याशीच चर्चा कशी काय होऊ शकते, असा सवाल नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला असून, पालकमंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात साळगावकर यांनी ‘आर या पार’ची लढाई लढण्याचे ठरविले आहे. तशी घोषणा त्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. ते आज, सोमवारी येथील बापूसाहेब महाराज पुतळ््यासमोर एक दिवसाचे आत्मक्लेष आंदोलन करणार आहेत.
ख्रिश्चन समाजातील आश्रित महिलेचा मृतदेह श्रमविहार कॉलनीतील जागेत दफन करण्यात आला. या विरोधात स्थानिक नागरिकांनी आवाज उठविला. त्याला नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ख्रिश्चन समाजाच्या बाजूने निर्णय दिला. या विरोधात नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
संबंधित जागा ही ख्रिश्चन समाजाची दफनभूमी नाही. मग तेथे मृतदेह दफन करणे योग्य नाही. एक व्यक्ती समाजात शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्यावर प्रथम कारवाई झाली पाहिजे. ज्या व्यक्तींवर गुन्हे दाखल केले गेले पाहिजेत त्यांच्याशीपालकमंत्री दीपक केसरकर हे चर्चा करतात. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे आणि नागरिकांना न्याय द्यावा. श्रमविहार कॉलनीतील नागरिक दहशतवादामुळे बोलण्यास तयार नाहीत, असेही ते म्हणाले.
बिशप आॅल्विन बरेटो हा मृतदेह काढण्यास तयार होते. पालकमंत्री केसरकर यांनीही मला तसेच करणार असल्याचे सांगितले, मात्र धर्मगुरुंशी चर्चेवेळी त्यांनी आपला निर्णय फिरविला. श्रमविहार कॉलनीतील शांत, संयमी नागरिकांवर त्यांनी आपला निर्णय लादल्याचा आरोप नगराध्यक्ष साळगावकर यांनी केला. सावंतवाडीकरांच्या संवेदना काय असतात, हे या आंदोलनातून दाखवून देऊ, असे साळगावकर यांनी सांगितले.
सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत येथील बापूसाहेब महाराज पुतळ््यासमोर मी एकटा आत्मक्लेष आंदोलन करणार आहे. हे आंदोलन पालकमंत्र्यांच्या एकतर्फी निर्णयाचा निषेध म्हणून आहे, असे साळगावकर यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)
मृतदेहाची सखोल चौकशी होणे गरजेचे
श्रमविहार कॉलनीच्या मागच्या बाजूला जो मृतदेह दफन करण्यात आला आहे, त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. हा मृतदेह कोणाचा तसेच कशाने मृत्यू झाला आहे? संबंधित महिलेचा मृत्यू गोवा येथे झाला आहे. मग वैद्यकीय प्रमाणपत्र वेंगुर्ले येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कसे काय? निरवडे येथील महिलेचा मृतदेह येथे आणण्यामागचे कारण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणातील सर्व दोषींची चौकशीची मागणी साळगावकर यांनी केली आहे.