‘सौर कुंपण’ योजना राबविण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:07 AM2017-08-22T00:07:14+5:302017-08-22T00:07:14+5:30

Decision to implement 'solar fence' scheme | ‘सौर कुंपण’ योजना राबविण्याचा निर्णय

‘सौर कुंपण’ योजना राबविण्याचा निर्णय

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला असून यामुळे येथील शेतकरी हतबल झाले आहेत. हत्ती, गवे, डुक्कर, माकड आदी वन्य प्राणी शेतीबागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. विशेषत: हत्ती व गव्यांचा उपद्रव थांबवावा यासाठी तत्काळ प्रयत्न सुरू केले आहेत. हेवाळे येथे कंपाऊंड वॉल तर मळगाव येथे ८ किलोमीटर सौर कुंपण घालण्यात येणार असून गव्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी शेतकºयांना समूह शेतीच्या माध्यमातून सौर कुंपणाची योजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सोमवारच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. हा उपद्रव कमी व्हावा यासाठी ठोस निर्णय घेण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकाºयांच्या उपस्थितीत खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर राऊत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार वैभव नाईक, अभय शिरसाट, संजय पडते, नागेंद्र परब आदी उपस्थित होते.
यावेळी राऊत म्हणाले की, जिल्ह्यात हत्ती, गवे, डुक्कर, माकड आदी वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला असून हे प्राणी शेती आणि बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. या वन्य प्राण्यांच्या वावरामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला या संकटातून मुक्त करण्यासाठी काही ठोस निर्णय घेणे आवश्यक आहेत. त्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत याबाबत संबंधित प्रमुख अधिकाºयांची बैठक घेण्यात आली.
दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे या परिसरात हत्तींचा वावर आहे. या परिसरात हे हत्ती मोठ्या प्रमाणात शेती-बागायतींचे नुकसान करीत आहेत. या हत्तींना माणगावप्रमाणेच पकडण्याची मोहीम राबविण्याची तयारी सुरु आहे. तरीही या परिसरात येण्यापासून हत्तींना अडविण्यासाठी ५ कंपाऊंड वॉल बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिला कंपाऊंड वॉल सर्व्हे नं. २८ मध्ये घालण्यात येणार असून हे कंपाऊंड वॉल आॅक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर राधानगरी (कोल्हापूर) येथील हत्ती गगनबावडा येथून जिल्ह्यात घुसखोरी करीत आहेत. त्यांना जिल्ह्यात येण्यापासून अटकाव करण्यासाठी कोल्हापूर वनविभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात ऊस लागवडीचे क्षेत्र वाढू लागले आहे. मात्र उत्पादनात वाढ झालेली नाही. यावर येथील ऊस उत्पादक शेतकºयांना ऊस लागवडीबाबत मार्गदर्शन व्हावे तसेच जिल्ह्यात ऊस संशोधन केंद्र व्हावे यासाठी आपले प्रयत्न आहेत. या केंद्राच्या उभारणीसाठी लागणारी २५ हेक्टर क्षेत्र जमीन देण्याचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मान्य केले आहे. हे ऊस संशोधन केंद्र झाल्यास येथील शेतकºयांना योग्य ते मार्गदर्शन मिळून आता ते एकरी ३० टन उत्पादन घेत असलेले पीक ८० टनापर्यंत जाऊ शकते, अशी माहिती राऊत यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यातील बीएसएनएलची स्थिती सुधारण्यासाठी टॉवर होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात एकूण ९६ टॉवर प्रस्तावित आहेत. यापैकी १२ टॉवर समुद्रकिनारी होणार आहेत. तर जिल्ह्यात ८४ टॉवर आॅक्टोबरपर्यंत कार्यान्वित होणार आहेत. यातील तीन टॉवर हे गणेशोत्सवाच्या कालावधीत सुरू होणार असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली.
सीआरझेड संदर्भातील २४ ची सभा चुकीची
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सीआरझेड, वनसंज्ञा, बीएसएनएल या महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेण्यासाठी केंद्रीय समित्या २४ आॅगस्ट रोजी सिंधुदुर्गात येत आहेत अशी माहिती वर्तमानपत्रांच्या माध्यमातून समजली आहे. अधिकृत याबाबत कोणतीही माहिती नाही. जिल्ह्याच्या दृष्टीने हे तिन्ही विषय फार महत्त्वाचे आहेत. मात्र त्यासाठी निवडण्यात आलेली २४ आॅगस्ट ही गणपतीच्या आदल्या दिवसाची स्थानिक सुटीची तारीख योग्य नाही. पण हे विषय जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असल्याने बैठक झाली तर जिल्हावासीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण या बैठकीस उपस्थित राहणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले.

Web Title: Decision to implement 'solar fence' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.