एस टी कामगारांचा पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय, दिलीप साटम यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 08:24 PM2018-01-19T20:24:59+5:302018-01-19T20:25:31+5:30
एस.टी. कामगारांना अपेक्षित वेतनवाढ मिळत नसल्याने शासनाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा प्रस्ताव आयोग कृती समितीने फेटाळला आहे. तसेच आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पुन्हा एकदा संप करण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती एस टी कामगार संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय सचिव दिलीप साटम यांनी दिली.
कणकवली - एस.टी. कामगारांना अपेक्षित वेतनवाढ मिळत नसल्याने शासनाने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा प्रस्ताव आयोग कृती समितीने फेटाळला आहे. तसेच आपल्या न्याय्य मागण्यांसाठी पुन्हा एकदा संप करण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती एस टी कामगार संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय सचिव दिलीप साटम यांनी दिली.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुंबई येथे शुक्रवारी एस टी का मगारांच्या आयोग कृती समितीची बैठक झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मागील संपाच्यावेळी वेतनवाढीपोटी 1076 कोटींचा प्रशासनाने दिलेला प्रस्ताव आयोग कृती समितीने नाकारला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये गठित केलेल्या उच्च स्तरीय समितीने उच्च न्यायालयात सादर केलेल्या शिफारशीमध्ये पूर्वी प्रशासनाने देवू केलेल्या 2.57 च्या सूत्रांऐवजी 2.37 चे सूत्र दिलेले आहे. वार्षिक वेतन वाढीचा दर 3 टक्याऐवजी 2 टक्के केला आहे.
घर भाड़े भत्यामध्ये 10 टक्क्यांऐवजी 7 टक्के, 20 टक्क्यांऐवजी 14 टक्के, 30 टक्क्या ऐवजी 21 टक्के घट केली आहे. सुधारित वेतन वाढीची अंमलबजावणी 1 एप्रिल 2016 ऐवजी 1 जानेवारी 2018 पासून 4 वर्षासाठी करणे. या प्रस्तावामुळे एस टी कामगारांना अपेक्षित वेतन वाढ मिळत नसल्याने उच्च स्तरीय समितीचा हा प्रस्ताव आयोग कृती समितीने फेटाळला असून संपासह इतर आंदोलने करण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे.
त्यानुसार 25 जानेवारी रोजी राज्यभर डेपो किंवा युनिटच्या गेटवर उच्च स्तरीय समितीच्या अहवालाची होळी करण्यात येणार आहे. 9 फेब्रुवारी रोजी राज्यभरातील एस टी कर्मचाऱ्यांचा त्यांच्या कुटुंबियांसह मुंबई येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. तसेच त्याच दिवशी संपाची तारीख निश्चित केली जाणार आहे. असेही या पत्रकात म्हटले आहे.