मत्स्यदुष्काळ घोषित करून आर्थिक सहकार्य करा, मच्छीमार संघटनेची मागणी
By सुधीर राणे | Published: November 25, 2022 03:40 PM2022-11-25T15:40:52+5:302022-11-25T15:42:03+5:30
जिल्हा श्रमजीवी रापण मच्छीमार संघांच्यावतीने आमदार नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी
कणकवली: हवामानात सातत्याने होत असलेले बदल, पर्ससीनधारकांचा धुमाकुळ यासह अनेक समस्येमुळे मासेमारी व्यवसाय अडचणीत आला आहे. येत्या अधिवेशनात सरकारने गांभीर्याने मच्छीमारांच्या समस्यांचे निराकरण करुन ‘मत्स्यदुष्काळ' घोषित करावा. तसेच आर्थिक सहकार्य घोषित करावे, अशी मागणी जिल्हा श्रमजीवी रापण मच्छीमार संघ यांच्यावतीने आमदार नितेश राणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनात म्हटले आहे की, सन २०१६ ते आज मितीस तालुक्यातील सगळे रापण संघ 'मत्स्यदुष्काळाच्या' खाईत लोटले गेले आहेत. रापण व्यवसायावर अवलंबित सदस्यांच्या कुटुंबियांची उपासमार सुरु आहे. मागील सरकारने आपत्कालीनदृष्टीने थोडीफार मदत केली. पण ३ वर्षात किनारपट्टीवर खांडवी मासळी येत नाही. हवामानात सातत्याने होत असलेले बदल, पर्ससीनधारकांचा धुमाकुळ, परराज्यातील नौकांकडून होत असलेली मासळीची लुट व त्यातच हायस्पीड परप्रांतीय यामुळे मासेमारीच्या ऐन हंगामात थव्यांची मासळी येणे किनारपट्टीवर दुरापास्त झाले आहे.
परिणामी रापण व्यवसाय डबघाईस आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांप्रमाणे मच्छिमारांनाही 'आत्महत्ये'चा पर्याय शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रशासनाने सद्यस्थिती माहिती घेऊन अहवाल बनवावा तसेच 'मत्स्यदुष्काळजन्य' स्थितीचा अहवाल शासनाकडे सादर करावा अशी मागणी करण्यात आली.