हळदीचे नेरूर येथे मोबाईल मनोऱ्याचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 13:58 IST2021-01-02T13:36:20+5:302021-01-02T13:58:49+5:30
Vinayak Raut Sindhudurg- वंचित भागाचा कच्चा दुवा पकडून आपण कोकणच्या सह्यपट्ट्यात सर्वत्र मोबाईलची रेंज कशी मिळेल यावर आपला जोर राहील, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.

खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते हळदीचे नेरूर येथील मोबाईल मनोऱ्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बाळा सावंत, श्रेया परब, सरपंच सागर म्हाडगुत, राजू कविटकर आदी उपस्थित होते. (छाया : विजय पालकर)
माणगाव : जागतिकीकरणाच्या या धकाधकीच्या काळात माहिती आणि तंत्रज्ञानाने जगाच्या कक्षा रूंदावल्या आहेत. अन्न, वस्त्र व निवारा या माणसांच्या मूलभूत गरजांसोबत मोबाईलचा वापर हीसुद्धा अत्यावश्यक बाब बनली आहे. ग्रामीण व दुर्गम भागांत मोबाईल मनोऱ्याची वानवा असल्याने येथील लोक हताश झाले आहेत.
वंचित भागाचा हाच कच्चा दुवा पकडून आपण कोकणच्या सह्यपट्ट्यात सर्वत्र मोबाईलची रेंज कशी मिळेल यावर आपला जोर राहील, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले.
कुडाळ तालुक्यातील हळदीची नेरूर येथील मोबाईल मनोऱ्याचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी उपसभापती श्रेया परब, कुमारी रूची राऊत, अमर सावंत, राजू कविटकर, बाळ सावंत, सरपंच सागर म्हाडगुत, बबन बोभाटे, योगेश धुरी, श्रीकृष्ण परब, राजन नाईक, लवू पालकर, सुनील सावंत, श्रीकृष्ण नेवगी, तुषार परब, आत्माराम सावंत, यशवंत कदम, यासह दूरसंचार खात्याचे प्रवीणकुमार आणि नितीशजी उपस्थित होते. बाळ सावंत यांनी प्रास्ताविक केले. श्रेया परब व अमरसेन सावंत यांनी विचार मांडले.
अजून चार मोबाईल मनोरे कार्यान्वित होतील
खरेतर हळदीचे नेरुर मोबाईल टॉवरचे उद्घाटन गेल्यावर्षीच्या मे महिन्यातच होणार होते. पण कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीने लॉकडाऊनचा सिलसिला सुरू झाला. त्यामुळे लोकांची रेंज मिळण्याची प्रतीक्षा आणखी लांबत गेली. पण आपण दिलेला शब्द पाळतो म्हणजे पाळतो. त्याचं फलित म्हणजे हा आजचा मोबाईल मनोऱ्याचे लोकार्पण सोहळा होय. या भागात आता इतर चार ठिकाणी मोबाईलचे मनोरे कार्यान्वित होतील. त्यात प्रामुख्याने महादेवाचे केरवडे व वसोली येथील केंद्रांचा समावेश असेल असेही खासदार विनायक राऊत म्हणाले.