‘दीपसंध्या’ने रसिक मंत्रमुग्ध
By admin | Published: November 13, 2015 08:54 PM2015-11-13T20:54:07+5:302015-11-13T23:41:03+5:30
सूरमय संध्याकाळ : कणकवलीत युवारंजन कलामंचचे आयोजन
कणकवली : आली माझ्या घरी ही दिवाळी..., सोनियाच्या ताटी, उजळल्या ज्योती.. अशा एकाहून एक सरस गीतांनी कणकवलीवासीयांची संध्याकाळ सूरमय झाली. निमित्त होते... युवारंजन कलामंचने आयोजित केलेल्या ‘दीपसंध्या’ या कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात संगीतरसिक मंत्रमुग्ध होऊन गेले.
कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या पटांगणावर दिवाळीचे औचित्य साधून ‘दीपसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचा प्रारंभ कणकवली शिक्षण संस्थेचे चेअरमन सुरेश कामत यांच्या हस्ते केला. यावेळी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, अक्षरसिंधू कलामंचचे संस्थापक अध्यक्ष विजय चव्हाण, प्रा. हरिभाऊ भिसे, महानंद चव्हाण, डी. पी. तानावडे, दीपक बेलवलकर, अॅड. राजेंद्र रावराणे, उदय सर्पे, महेश काणेकर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमातील गीतकारांना शेखर सर्पे, अमित रगजी, प्रथमेश पेडणेकर, प्रसाद धुमाळ, महेंद्र्र मांजरेकर, संतोष मोहिते, प्रमिल इसवलकर, अश्विन जाधव यांनी संगीत साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. अविट गोडीची गाणी युवारंजन कलामंचच्या कलाकारांनी सादर करून कणकवलीवासीयांची संध्याकाळ यादगार बनविली. (वार्ताहर)
सुश्राव्य गीतांचा नजराणा
‘प्रथम तुला वंदितो, सांज ये गोकुळी, शुक्रतारा मंद वारा, धुंदी कळ्याना, रूपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना, मेंदीच्या पानावर, या जन्मावर, मी वाऱ्याच्या वेगाने, जेव्हा तुझ्या बटाना, वृंदावणी वेणु अशा सुश्राव्य गीतांचा नजराणा प्रमिल इसवलकर, अभी मेस्री, डॉ. निशा धुरी, प्रियांका मुसळे, राकेश मिठबावकर या गायकांनी रसिकांसमोर सादर केला.