सावंतवाडीत महाविकास आघाडी होईल : दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:15 PM2019-12-16T12:15:23+5:302019-12-16T12:17:17+5:30
सावंतवाडीत सर्वच पक्षांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने आता चुरस निर्माण झाली आहे. मात्र, महाविकास आघाडी झाली तर भाजपविरुद्ध शिवसेना थेट लढत होणार आहे. सध्यातरी महाविकास आघाडीचे भवितव्य अधांतरी असले तरी महाविकास आघाडी निश्चित होईल, असा विश्वास शिवसेनेचे नेते, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते दिल्लीत असल्याने चर्चा लांबली आहे.
सावंतवाडी : सावंतवाडीत सर्वच पक्षांनी निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने आता चुरस निर्माण झाली आहे. मात्र, महाविकास आघाडी झाली तर भाजपविरुद्ध शिवसेना थेट लढत होणार आहे. सध्यातरी महाविकास आघाडीचे भवितव्य अधांतरी असले तरी महाविकास आघाडी निश्चित होईल, असा विश्वास शिवसेनेचे नेते, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते दिल्लीत असल्याने चर्चा लांबली आहे.
सावंतवाडीत काँग्रेसकडून दिलीप नार्वेकर, भाजपकडून संजू परब, शिवसेनेकडून बाबू कुडतरकर आदींनी अर्ज दाखल केले आहेत. तर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
जावेद शेख आणि अमोल साटेलकर यांनीही प्रथमच नगरपालिका निवडणुकीत उडी घेतल्याने मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. हे सर्व टाळण्यासाठीच माजी मंत्री केसरकर महाविकास आघाडी व्हावी यासाठी आग्रही दिसत आहेत.
भाजपने सध्यातरी प्रचारात आघाडी घेतली असून, शिवसेना व काँग्रेस हे अद्यापही महाविकास आघाडी होईल का? या प्रतीक्षेत आहेत. महाविकास आघाडी होण्यासाठी काँग्रेस व शिवसेना आग्रही आहे. मात्र, अटी अनेक असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. काँग्रेसकडून पुढील दोन वर्षांसाठी नगराध्यक्ष पद आपणास मिळावे असा आग्रह आहे. तर शिवसेना म्हणते हे पद शिवसेनेचे आहे, मग आम्ही तुम्हांला कसे द्यायचे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नसला तरी महाविकास आघाडी झाली नाही तर आयत्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस बबन साळगावकर यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
मात्र, या सर्व घाडामोडीत माजी मंत्री दीपक केसरकर आजही महाविकास आघाडीसाठी आग्रही आहेत. ते थेट काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून, शनिवारी याबाबत टिळक भवन येथे काँग्रेसच्या नेत्यांसोबत केसरकर यांची बैठक होती. मात्र, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आंदोलनानिमित्त दिल्ली येथे असल्याने शनिवारी बैठक झाली नाही. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत बैठक होऊन तोडगा निघेल, असा विश्वास केसरकर यांना आहे.
आघाडी होण्यासाठी केसरकर यांनी काँग्रेसच्या नेत्यांची मानसिकता तयार केली आहे. जर आघाडी झाली नाही तर राणे पुन्हा सावंतवाडीत येतील आणि आपली ताकद वाढल्याचे सांगतील, अशी भीती काँग्रेस नेत्यांकडे व्यक्त करीत सध्यातरी राष्ट्रवादीचा उमेदवार नाही. पण काँग्रेसचा उमेदवार असल्याने त्याने ती उमेदवारी मागे घ्यावी म्हणून केसरकर जोरदार प्रयत्न करीत आहेत. त्यांना अजूनही महाविकास आघाडी होईल असा विश्वास आहे.