दीपक केसरकरांनी आतापर्यंत पालिकेला फुटकी कवडीही दिली नाही : संजू परब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 06:28 PM2020-12-30T18:28:42+5:302020-12-30T18:30:06+5:30
Dipak Kesarkar News- आमदार दीपक केसरकर राजशिष्टाचाराची भाषा करतात; पण त्यांनी ते नगराध्यक्ष असताना तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांना कितीवेळा कार्यक्रमाला बोलविले ते सांगावे आणि नंतर राजशिष्टाचाराची भाषा करावी. पालकमंत्री उदय सामंत ११ कोटी रुपये दिल्याचे सांगतात. मात्र, त्यांनी आतापर्यंत पालिकेला फुटकी कवडीही दिली नाही. घोेषणा तेवढ्या करतात, अशी जोरदार टीका सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे.
सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर राजशिष्टाचाराची भाषा करतात; पण त्यांनी ते नगराध्यक्ष असताना तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांना कितीवेळा कार्यक्रमाला बोलविले ते सांगावे आणि नंतर राजशिष्टाचाराची भाषा करावी. पालकमंत्री उदय सामंत ११ कोटी रुपये दिल्याचे सांगतात. मात्र, त्यांनी आतापर्यंत पालिकेला फुटकी कवडीही दिली नाही. घोेषणा तेवढ्या करतात, अशी जोरदार टीका सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे.
ते सावंतवाडी नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावले, नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक उपस्थित होते.
नगराध्यक्ष परब म्हणाले, सावंतवाडी नगरपालिका जी उद्घाटने करत आहेत, तो सर्व निधी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे त्याचे श्रेय माजी मंत्री दीपक केसरकर यांनी घेऊ नये. नगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. त्यावर कोण दडपण आणू शकत नाही. तसेच केसरकर हे राजशिष्टाचाराबाबत सांगत आहेत; पण त्यांनी हा शिष्टाचार आपल्या काळात पाळला होता का? तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी सावंतवाडी नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. त्यावेळी नगराध्यक्षपदी दीपक केसरकर काही काळ होते. तसेच त्यांचीच सत्ता होती. मग कोणत्या उद्घाटनाला राणे यांंना बोलावले याचे उत्तर केसरकर यांनी द्यावे, असेही परब म्हणाले.
सावंंतवाडी नगरपालिका आपल्या वेगवेगळ्या निधीतून विकासकामे करीत आहे. पालकमंत्री उदय सामंत हे आपण ११ कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांंगतात पण हा निधी त्यांनी दाखवून द्यावा. अद्यापपर्यंत एक रुपयाचा निधीही मिळाला नसल्याचा उच्चार करीत मंत्री सामंत यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. आम्ही रितसर पालकमंत्री म्हणून उदय सामंंत तर आमदार म्हणून दीपक केसरकर यांचा निमंत्रणपत्रिकेत उल्लेख केला होता, तसे निमंत्रणही त्यांना दिले होते. पण ते येत नसतील तर आम्ही कार्यक्रम करून घेऊ, असेही परब यांनी सांगितले.