कोणता झेंडा घेऊ हाती? दीपक केसरकर शिंदे गटात, पण समर्थक संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 08:19 PM2022-07-06T20:19:00+5:302022-07-06T20:19:42+5:30
Deepak Kesarkar : शिवसैनिकांची ही केसरकरांना साथ मिळताना दिसून येत नाही. तर दुसरीकडे केसरकर हे सुद्धा आपण अद्याप शिवसेनेतच असल्याचे जरी सांगत असले तरी शिवसेना ही ते मान्य करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.
- अनंत जाधव
सावंतवाडी : शिवसेना आमदार दीपक केसरकर हे जरी शिंदे गटात सामील झाले असले तरी त्यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक अद्यापही संभ्रमावस्थेत असून दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस वगळता एकानेही अद्याप आपण केसरकर यांच्या सोबत जाण्याचे जाहीर केले नाही. मात्र दुसरीकडे भविष्यातील धोका ओळखून शिवसेना अॅक्शन मोडवर आली असून केसरकर समर्थकांना वेळीच पदावरून दूर करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यातील बंडखोरी टाळण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्रात जे सत्ता नाट्य घडले, त्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ सुद्धा कुठे मागे नाही, येथील शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनीही 40 आमदारांसोबत शिंदे गटात सामील होत शिवसेनेला मोठा हादरा दिला असला तरी या हादऱ्याचे पडसाद सावंतवाडी विधानसभा मतदार संघात उमटताना कुठेही दिसत नाही. शिवसैनिकांची ही केसरकरांना साथ मिळताना दिसून येत नाही. तर दुसरीकडे केसरकर हे सुद्धा आपण अद्याप शिवसेनेतच असल्याचे जरी सांगत असले तरी शिवसेना ही ते मान्य करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केसरकर समर्थकांची अवस्था चलबिचल झाली आहे.
कोणीही उघडपणे आपण केसरकर यांच्यासोबत असल्याचे त्यांचे समर्थक सांगत नाही आणि दुसरीकडे शिवसेनेच्या बैठकांनाही येत नाही, अशा केसरकर समर्थकावर शिवसेनेकडून लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यातूनच दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांना बदलून संजय गवस यांच्याकडे तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर सावंतवाडीतील महिला शहरप्रमुख ही बदलण्यात आले असून या पदावर श्रृतिका दळवी यांची निवड करण्यात आली आहे. मात्र इतर पदाधिकाऱ्यांची पदे अद्याप जैसे थे ठेवण्यात आली आहेत.
केसरकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, राघोजी सावंत तसेच वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यातील काही पदाधिकारी अद्याप ही संभ्रमावस्थेत आहेत. ते केसरकर यांचीच सोबत करणार असले तरी पुढे कोणता झेंडा हाती घ्याचा, असा प्रश्न त्यांना सतावू लागला आहे. पण सध्यातरी केसरकर यांनी शिवसेनेतच कायम असल्याचे जाहीर केले असले तरी मूळ शिवसैनिक मात्र केसरकर यांना स्वीकारण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत. त्यामुळे केसरकर यांना समर्थकांना जर राजकीय प्रवाहात आणण्याचे झाल्यास कोणतातरी झेंडा हातात घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही.
विनायक राऊतांची चालाखी शिवसेनेच्या पथ्यावर
2014 मध्ये केसरकर हे राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत आले, तेव्हा केसरकर यांना शिवसेनेने आमदार केले. त्यानंतर मंत्रिपदही दिले पण केसरकर यांच्या ताब्यात ना जिल्ह्यातील संघटना दिली, ना त्यांच्या मतदारसंघातील दिली. त्यामुळेच आज जरी केसरकर शिंदे गटात गेले तरी पक्षाचा लहान मोठा पदाधिकारी शिवसेनेसोबत असल्याचा दिसून येत असून तेव्हाची विनायक राऊतांची ही खेळी शिवसेनेच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले.