दीपक केसरकरांचे विनवणी नाट्य अन् नागरिकांत चर्चा रंगली विसंवादाची
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 02:27 PM2023-06-07T14:27:50+5:302023-06-07T14:29:14+5:30
सावंतवाडी : सावंतवाडी येथील विविध विकासकामांच्या निमित्ताने आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या ...
सावंतवाडी : सावंतवाडी येथील विविध विकासकामांच्या निमित्ताने आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या घरी डिनर डिप्लोमासी आयोजित केली होती. मात्र कुडाळ येथील कार्यक्रमाला तब्बल दोन तास उशीर झाल्याने डिनर डिप्लोमसीला मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. चक्क व्यासपीठावरच मंत्री केसरकर यानी मुख्यमंत्र्यांना विनवणी करत असल्याचे दिसून आले. मात्र हा सर्व प्रकार नागरिकांसमोर सुरू असल्याने याची उलटसुलट चर्चा सुरु होती.
विविध विकास कामांच्या निमित्ताने प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सावंतवाडीत आले होते. त्याचा मुख्य कार्यक्रम शासन आपल्या दारी हा कुडाळ येथे आयोजित करण्यात आला असल्याने त्या कार्यक्रमाला तब्बल दोन तास उशिर होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी सावंतवाडीतील कार्यक्रम लवकरात लवकर आटोक्यात घेण्यात यावा अशा सूचना सर्वानाच केल्या होत्या.
मात्र सावंतवाडी तील कार्यक्रम ही लांबत असल्याने उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सावंतवाडीतील कार्यक्रमातून काढता पाय घेत आणि ते कुडाळ च्या दिशेने रवाना झाले तर मुख्यमंत्र्यांनी ही मंत्री केसरकर यांना कार्यक्रम आटोपता घेऊया असे सांगितले. पण मंत्री केसरकर यांनी काही वेळासाठी घरी या अशी विनंती केली.पण मुख्यमंत्र्यांनी नकार देत लोक थांबले मी आता नाही नंतर येतो असे सांगून मुख्यमंत्र्यांनी येण्यास नकार दिला.
केसरकर हे सतत मुख्यमंत्र्यांना विनवणी करत होते आणि मुख्यमंत्री नकार देत होते. हा सर्व प्रकार व्यासपीठावर सुरू होता तर समोरील नागरिक ही हा सर्व प्रकार पाहात असल्याने मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्यात विसंवाद आहे कि काय? याचीच चर्चा सर्वत्र सुरू झाली. मात्र मुख्यमंत्र्यांनी अखेर मंत्री केसरकर यांची विनवणी धुडकावून लावत थेट कुडाळच्या कार्यक्रमाला रवाना झाले.