आगामी काळात सर्व निवडणूका युतीच्या माध्यमातून होणार - दिपक केसरकर
By अनंत खं.जाधव | Published: October 11, 2022 08:25 PM2022-10-11T20:25:38+5:302022-10-11T20:26:13+5:30
आगामी काळात सर्व निवडणूका युतीच्या माध्यमातून होणार असल्याचे दिपक केसरकर यांनी सांगितले.
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : आगामी काळात महाराष्ट्रात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप याच्यांत युती होणार आहे, त्यामुळे यापुढील सर्व निवडणुका युतीच्या माध्यमातून लढवण्यात येणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही हाच फॉम्युला राबविण्यात येणार आहे. त्याबाबत माझे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते मुंबई येथून ऑनलाइन पध्दतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, मुंबई आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आपले विशेष लक्ष आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून येत्या वर्षभरात शिक्षण व पर्यटनदृष्ट्या जिल्हा सुजलाम सुफलाम करु असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
माझ्या मतदारसंघातील माजी उपजिल्हाप्रमुखांनी मंगळवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिंदे गटात प्रवेश केला असून जिल्ह्यातील अनेक शाखाप्रमुखही शिंदे गटाच्या मार्गावर असल्याचे त्यांनी सांगितले. काही पदाधिकारी ही यायला इच्छुक आहेत लवकरच हा पक्षप्रवेश होईल एकूणच सावंतवाडी मतदारसंघाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगलं वातावरण शिंदे गटासाठी निर्माण झालेले आहे. त्यामुळे आगामी विकास सोसायटी पासून जिल्हा परिषदेपर्यंत सर्व निवडणुका या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप म्हणूनच लढवल्या जातील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याशी आपली मंत्रालयात याबाबत चर्चा झाली आहे. दोन्ही पक्ष एकत्रित येऊन काम करण्याचे ठरल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकास करण्यासाठी जे जे माझे सहकारी आहेत त्यांनी कार्यरत रहावे असे आवाहन ही त्यांनी केले.
केसरकर पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनासाठी २८ कोटी रुपये सावंतवाडी, वेंगुर्ले , दोडामार्ग शहरांच्या पर्यटन विकासासाठी मंजूर झाले आहेत, जिल्ह्याची प्रगती होण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहेत. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या वेंगुर्ले उभादांडा येथील जन्म गावी कवितांचे गाव निर्माण करण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतला आहे तसेच देशभरातील अनेक संस्थांने मराठी भाषिक होती त्या सर्व संस्थानात, बेळगाव परिसरामध्ये मराठी भाषा संवर्धन उपक्रम हाती घेतला जाईल असेही केसरकर यावेळी म्हणाले.