सिंधुदुर्गात काथ्या उद्योगाची १४ युनिटे उभारणार : दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 03:47 PM2019-01-07T15:47:42+5:302019-01-07T15:49:52+5:30
वेंगुर्ले : चांदा ते बांदा योजनेअंतर्गत सिंधुदुर्गात काथ्या उद्योगाची १४ युनिटे उभारली जाणार असून, त्यातील सहा युनिटे कार्यान्वित झाली ...
वेंगुर्ले : चांदा ते बांदा योजनेअंतर्गत सिंधुदुर्गात काथ्या उद्योगाची १४ युनिटे उभारली जाणार असून, त्यातील सहा युनिटे कार्यान्वित झाली आहेत. नारळापासून विविध पदार्थांच्या उत्पादनासाठी प्रक्रिया उद्योग उभारल्यास ग्रामीण भागात आर्थिक स्थैर्य निर्माण होईल. या दृष्टीने संबंधित विभागांनी बचतगट व शेतकऱ्यांना प्रशिक्षणे तसेच प्रकल्प अहवाल याबाबतचे प्रस्ताव तत्काळ सादर करावेत, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केली.
वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य लघुउद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, वेंगुर्ले तहसीलदार शरद गोसावी, मुख्याधिकारी वैभव साबळे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, फळ संशोधन केंद्र्राचे बी. एन. सावंत, उद्योजक प्रशांत कामत, चांदा ते बांदाच्या प्रकल्प अधिकारी नंदिनी घाणेकर, खादी ग्रामोद्योग मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. केंजले, केरळ क्वॉयर बोर्डाचे प्रा. मनोज अय्यर, एम. व्ही. अशोक, रणजित सावंत, कृषी विद्यापीठाचे विजय दळवी, अभिजीत महाजन आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री केसरकर म्हणाले, निरापासून साखर, चॉकलेट, मध उत्पादन करण्याबाबतचे प्रशिक्षण खादी ग्रामोद्योग मंडळाने घ्यावे. जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या माणगा या बांबूच्या जातीपेक्षा उत्ती संवर्धन रोपवाटिकेद्वारे बांबूची रोपे तयार करण्याबाबत कोकण कृषी विद्यापीठाने प्रस्ताव द्यावा, आदी सूचना केल्या.
जागा उपलब्धतेसाठी प्रयत्न करा!
नारळाच्या सोडणापासून काथ्या, खोबऱ्यांपासून खाण्याचे पदार्थ व खोबरेल, चॉकलेट, गूळ यासारखे प्रक्रिया उद्योग उभारले जाऊ शकतात. यासाठी काथ्या प्रक्रिया उद्योगाची उर्वरित युनिटे त्वरित सुरू करणे गरजेचे असून, त्यादृष्टीने महसूल विभागाने जागा उपलब्धतेबाबत प्रयत्न करावेत, अशी सूचना यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी केली.