सिंधुदुर्ग जिल्ह्यात मातृवृक्ष नारळाची नर्सरी उभारणार : दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 04:05 PM2018-09-03T16:05:54+5:302018-09-03T16:08:14+5:30
केरळ येथील मातृवृक्ष नारळाच्या झाडाची नर्सरी सिंधुदुर्गात उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी रोपे याठिकाणी मागविण्यात येणार असून त्यांची मंजुरी येत्या आठ दिवसांत देण्यात येणार आहे.
सावंतवाडी : केरळ येथील मातृवृक्ष नारळाच्या झाडाची नर्सरी सिंधुदुर्गात उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी रोपे याठिकाणी मागविण्यात येणार असून त्यांची मंजुरी येत्या आठ दिवसांत देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नारळ उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा लवकरच या ठिकाणी घेण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे दिले.
दरम्यान, नारळ बागायतदारांसाठी शासनाच्या अनेक योजना असूनही शेतकरी त्याचा लाभ का घेत नाहीत याचे उत्तर कृषी विभागाने द्यावे. यात दोषी आढळल्यास कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याची गय करणार नाही, असा सूचक इशाराही यावेळी पालकमंत्र्यांनी दिला.
सिंधुदुर्ग नारळ विकास बोर्डाच्यावतीने येथील नगरपालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहात जागतिक नारळ दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा नारळ उत्पादक संघाचे अध्यक्ष सुरेश गवस, नारळ विकास बोर्डाचे ठाणे उपसंचालक प्रमोद कुरियन, नारळ उत्पादक संघाचे कोषाध्यक्ष रामानंद शिरोडकर, निवृत्त कृषी अधिकारी डॉ. दिलीप नागवेकर, तालुका कृषी अधिकारी प्रमोद सावंत, उपविभागीय कृषी अधिकारी अडसूळ, रणजित सावंत, शिवसेना तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ, बबन राणे आदी उपस्थित होते.
केसरकर पुढे म्हणाले, नारळ उत्पादक संघाच्यावतीने दर चार गावांमधून एक समिती स्थापन करा. या माध्यमातून शेतकरी बागायतदारांना योजना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याशिवाय येथील शेतकरी, बागायतदार सक्षम व्हावा यासाठी केरळच्या धर्तीवर निरा काढण्यासाठी लागणारी आवश्यक परवानगी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
ही परवानगी मिळताच त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच बागायतदारांना निरा ठेवण्यासाठी आवश्यक गोष्टी पुरविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.|
केरळमध्ये असलेली मातृवृक्ष ही नारळाची प्रजात या ठिकाणी आणून येथील बागायदारांना नर्सरी उभारण्यासाठी मदत केली जाणार आहे. त्यासाठी बागायतदारांनी पुढाकार घ्यावा. भविष्यात ज्या गावांच्या बाजूने तिलारी कालवा गेला आहे, मात्र उंच भागातील गावांना व बागायतदारांना त्याचा लाभ मिळत नाही, अशांकरिता सौर विद्युत पंपाद्वारे भूमिगत वाहिन्यांमधून पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविक ठाणे नारळ विकास बोर्डाचे उपसंचालक प्रमोद कुरियन यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील नारळ बागायतदार उपस्थित होते. चिपी येथील विमानतळ लवकरच सुरु होईल. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे असेल. मात्र हे करताना येथील शेतकऱ्याचा मुलगा वैज्ञानिक व्हावा यासाठी तेथे ट्रेनिंग स्कूल उभारण्यात येणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले.