..तर दीपक केसरकरांना निवडून आणावेच लागेल, नितेश राणेंचे सूतोवाच 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 11, 2023 02:28 PM2023-03-11T14:28:42+5:302023-03-11T14:29:11+5:30

ठाकरे शिवसेना आता जवळपास संपली

Deepak Kesarkar will also be elected in the upcoming elections says MLA Nitesh Rane | ..तर दीपक केसरकरांना निवडून आणावेच लागेल, नितेश राणेंचे सूतोवाच 

..तर दीपक केसरकरांना निवडून आणावेच लागेल, नितेश राणेंचे सूतोवाच 

googlenewsNext

कणकवली : राज्यात भाजप शिवसेनेची युती असल्याने भविष्यात २०२४ च्या निवडणुकीत जिल्ह्यातील एक मतदार संघ सेनेच्या वाट्याला गेला तर विद्यमान आमदार व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवडून आणावेच लागेल. असे सूतोवाच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच खासदारही भाजप सेना युतीचाच असेल मात्र ही कोणाकडे जाते याबाबतची बोलणी वरीष्ठ स्तरावर सुरू आहे. आपण यावर भाष्य करणार नाही. मात्र, ठाकरे सेनेचा खासदार यापुढे नसेल, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत राजकीय भाष्य करताना जिल्ह्यातील आगामी राजकारणाची रणनितीच स्पष्ट केली. राणे म्हणाले, दीपक केसरकर हे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. तसेच ते  भाजप शिवसेना युतीच्या राज्य मंत्रीमंडळात शिक्षणमंत्री आहेत. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक भाजप शिवसेना युती म्हणून लढविली जात असताना जर एक जागा शिवसेनेकडे गेली तर दीपक केसरकर यांना निवडून आणणे युती म्हणून आमची जबाबदारी असेल.

एकेकाळी राणे समर्थक असलेलेच आज ठाकरे सेनेचे सिंधुदुर्गात नेतृत्‍व करत आहेत. ठाकरे सेनेच्या तीन जिल्‍हाप्रमुखांपैकी दोन मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तर एक जण आमच्या संपर्कात आहे. त्‍यामुळे सिंधुदुर्गातील ठाकरे सेना किती दिवस जिवंत ठेवायची हे आमच्यावर आहे.

राणे म्‍हणाले, उद्धव ठाकरे यांनी नेहमीच निष्‍ठावंत शिवसैनिकांवर अन्याय केला आहे. ठाकरे स्वत:ची शिवसेना बांधू शकले नाहीत हे चित्र संपूर्ण महाराष्‍ट्राची जनता आज पाहत आहे. सिंधुदुर्गातील ठाकरे शिवसेना आता जवळपास संपली आहे. आम्‍ही व्हेंटीलेटरची वायर काढली की लगेच ठाकरे सेनेचे अस्तित्व संपुष्‍टात येणार आहे. कारण नुकतेच नेमण्यात आलेले तिनही जिल्‍हाप्रमुख आमच्या संपर्कात आहेत. यातील दोघे केव्हाही शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. तर तिसरा जिल्‍हाप्रमुख आमच्याकडे येणार आहे. त्‍यामुळे जिल्‍ह्‍यातील तीनही आमदार आणि खासदार देखील आमचाच असणार आहे.

सिंधुदुर्गात एक मतदारसंघ शिंदे गटाला सोडणार का? या प्रश्‍नावर बोलताना राणे म्‍हणाले, जे विनर सीट आहेत, त्‍या तशाच राहतील. तसेच केसरकर हे शिंदे गटाचे प्रमुख आहेत. त्‍यामुळे सावंतवाडीत आम्‍हाला त्‍यांना निवडून आणावं लागेल. तर खासदारकीसाठी शिंदे गट की भाजपचा उमेदवार असेल याबाबतचा निर्णय वरिष्‍ठ पातळीवर होईल. पण कोणत्‍याही परिस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचा खासदार निवडून येणार नाही.

Web Title: Deepak Kesarkar will also be elected in the upcoming elections says MLA Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.